Sachin Pilot vs Ashok Gehlot over Gaddar Jibe: काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी स्वपक्षीय वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी ‘गद्दार’ अशा उल्लेख करत केलेल्या टीकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला ‘गद्दार’ असा उल्लेख केल्याने ‘फार वाईट वाटलं’ होतं तसेच मी ‘दुखावलो गेलो’ होतो, असं पायलट यांनी म्हटलं आहे. ‘एनडीटीव्ही’शी बोलताना पायलट यांनी नेतृत्वासंदर्भातील आपली भूमिका मांडताना, “हा निर्णय पक्षाचा असतो” आणि “आम्हा सर्वांना एकत्र काम करायचं आहे,” या दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हो मी राजकारणी आहे. मात्र मी सुद्धा एक माणूसही आहे. मलाही वाईट वाटतं, मी सुद्धा दुखावलो जातो,” असं भावनिक विधान पायलट यांनी केलं आहे. मात्र त्याचवेळी हे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्याची आपली इच्छा नसल्याचे संकेतही त्यांनी दिले. “मला पुन्हा भूतकाळात जाण्याची इच्छा नाही,” असं पायलट यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये या ‘गद्दार’ टीकेबद्दल सांगितलं. “सार्वजनिक जिवनामध्ये विरोधी मतं असली तरी एक सन्मान राखला गेला पाहिजे. मात्र त्याचवेळी घडलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला वाट काढत पुढे गेलं पाहिजे. तसेच माझ्या हातात सध्या बरंच काम आहे, माझं एक ध्येय ठरलेलं आहे आणि त्याच दिशेने मी वाटचाल करत आहे,” असं पायलट यांनी म्हटलं. २०१८ साली राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजय मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पायलट आणि मुख्यमंत्री गेहलोत यांच्यामध्ये मागील बऱ्याच काळापासून मतभेद आहेत.

राजस्थानच्या राजकारणाबरोबरच राष्ट्रीय स्तरावरही गेहलोत आणि पायलट यांच्यामधील मतभेदांच्या बातम्या वरच्यावर चर्चेत असतात. अनेकदा या वादामुळे काँग्रेसची राजस्थानमधील सत्ता जाते की काय किंवा सरकार पडतं की काय इतक्या टोपापर्यंतच्या चर्चा प्रसारमाध्यमांबरोबरच राजकीय वर्तुळातली रंगल्या आहेत. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करण्याच्या काही दिवसांआधीच गेहलोत यांनी पुन्हा हा वाद उकरुन काढणारं विधान केलं होतं. या विधानांतर गेहलोत आणि पायलट यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन ‘पक्षच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे,’ असं म्हटलं होतं. मात्र यापूर्वीपासून चालत आलेल्या मतभेदांची चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे हे मात्र खरं.

मागील महिन्यामध्ये ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेलहोत यांनी, “गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री बनू शतक नाही. हायकमांड सचिन पायलटला मुख्यमंत्री बनवणार नाही. त्या व्यक्तीच्या पाठीशी १० आमदार सुद्धा नाहीत. त्याने उठव केला नाही तर पक्षाचा विश्वासघात केला आहे,” असं म्हटलं होतं. यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं.