राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तेज प्रताप यादव रविवारी दुपारी अचानक पाटण्यातील राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयात दाखल झाले. भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेऊन आलेल्या तेज प्रताप यांनी आता राजकारणात सक्रीय होण्याची वेळ आली आहे असे सांगितले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी युवा कार्यकर्ते आणि पक्षाच्या विद्यार्थी शाखेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

तेज प्रताप यादव मागच्या दोन महिन्यांपासून त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत पत्नी ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्यासाठी तेज प्रतापने कोर्टात याचिका दाखल केली आहे. मी खूपच साधाभोळा आहे तर पत्नी आपल्यापेक्षा खूपच मॉडर्न आहे असे तेज प्रतापने सांगितले. रविवारी पक्ष कार्यकर्त्यांबरोबर दोन तास चर्चा केल्यानंतर तेज प्रतापने पत्रकार परिषद घेतली.

तीन राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले. भाजपा-आरएसएसवर टीका करताना ते बिहारमधील आमचे प्रमुख विरोधक आहेत असे तेज प्रताप म्हणाले. भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेऊन मी बिहारमध्ये परतलो आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत बिहार कुरुक्षेत्र बनेल. मतांचे सुदर्शन चक्र चालवून आम्ही विरोधकांचा वध करु असा दावा तेज प्रतापने केला. पत्नी ऐश्वर्या बरोबरच्या घटस्फोटाचा प्रश्न त्यांनी उडवून लावला.

Story img Loader