अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी फतेगड साहेब पोलिस ठाण्याचे अधिकारी बॉक्सिंगपटू विजेंदरसिंग आणि त्याचा मित्र राम सिंग यांना समन्स पाठविणार असून, त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
चंदीगढच्या सीमेवर असलेल्या झिराकपूर भागातील एका अनिवासी भारतीयाच्या घरातून पोलिसांनी २६ किलोचे हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १३० कोटी रुपये आहे. ज्या घरातून हेरॉईन जप्त करण्यात आले, त्याच्याबाहेर विजेंदरसिंगच्या पत्नीची मोटार पार्क केल्याचे आढळले होते. यावरून विजेंदरसिंगचा या अंमली पदार्थ दलालाशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू झाला.
दरम्यान, पंजाब पोलिसांनी पकडलेल्या अंमली पदार्थ दलालाशी माझा काहीही संबंध नसल्याचा खुलासा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा बॉक्सिंगपटू विजेंदरसिंग याने केला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहिन असून, तपासात हे सर्व उघड होईलच, असेही त्याने म्हटले आहे.
विजेंदर म्हणाला, घडलेल्या घटनेने मला मोठा धक्का बसलाय. सध्या मी मुंबईत कामासाठी आलोय. मुंबईकडे येताना मला माझ्या मित्रांनी माझ्या बायकोच्या गाडीतून विमानतळावर सोडले. त्यानंतर ही गाडी झिराकपूर भागात कशी काय गेले, हे मला अजून कळलेले नाही. मला सोडल्यानंतर माझ्या मित्रांनी ती गाडी तिकडे नेली असण्याची शक्यता आहे. मात्र, या सगळ्यामध्ये माझे नाव कसे काय आले, हे समजत नाही. माझ्या मोटारीतून काहीही मिळाले नसल्याचे पोलिसांनी अगोदरच स्पष्ट केलंय.
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत अनिवासी भारतीय अनुपसिंग काहलोन त्याचा साथीदार कुलविंदर सिंग यांना अटक केलीये. काहलोन यानेच आपले विजेंदरसिंग आणि त्याचा मित्र रामसिंग यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी विजेंदरसिंगची चौकशी होणार
अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी फतेगड साहेब पोलिस ठाण्याचे अधिकारी बॉक्सिंगपटू विजेंदरसिंग आणि त्याचा मित्र राम सिंग यांना समन्स पाठविणार असून, त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

First published on: 08-03-2013 at 06:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am shocked dont have links with drug dealer says vijender singh