अलीकडेच विरोधी पक्षाने भारतातील अदाणी समूहाचे चीनशी संबंध असल्याचा दावा केला होता. याला ‘मॉरिस चांग’ नावाचे उद्योगपती कारणीभूत ठरले होते. चांग हे पीएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही कंपनी अदाणी समूहासाठी बंदरे, टर्मिनल, रेल्वे लाईन, पॉवर ट्रान्समिशन लाइन आणि इतर पायाभूत सुविधा तयार करते. मॉरिस चांग यांच्या पासपोर्टमुळे ते चिनी नागरिक असल्याचं म्हटलं जात होतं. यातूनच अदाणी समूहाचा चीनशी जोडला गेला होता. यावर आता स्वत: मॉरिस चांग यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मी तैवानचा नागरिक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
ईमेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मॉरिस चांग म्हणाले, “मी तैवानचा नागरिक आहे. मी ‘रिपब्लिक ऑफ चायना’चा नागरिक असल्याचं माझ्या पासपोर्टवर नमूद आहे. हा प्रदेश अधिकृतपणे तैवान म्हणून ओळखला जातो. तैवान हा चीनपेक्षा वेगळा देश आहे. याला अधिकृतपणे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हटले जाते.
मॉरिस चांग यांच्यामाध्यमातून अदाणी समूहाचे चीनशी कथित संबंध आहेत. त्यामुळे अदाणींना भारतातील बंदर चालवण्याची परवानगी का देण्यात आली? राष्ट्रीय सुरक्षेची मुद्दा विचारात का घेतली नाही? असा सवाल काँग्रेसने केला होता.
अदाणी समूहाबरोबर पीएमसी कोण-कोणत्या प्रकल्पांवर काम करत आहे, या प्रश्नाचं उत्तर मात्र मॉरिस चांग यांनी दिलं नाही. अदाणी समूहाच्या कंपन्यांसाठी आयात केलेल्या उपकरणांच्या किमती वाढवल्याचा आरोपही पीएमसीवर आहे. चांग म्हणाले, “मी तैवानमधील एक प्रस्थापित उद्योगपती आहे. जागतिक व्यापार, जहाजबांधणी, पायाभूत सुविधा प्रकल्प, जहाज बांधणी या क्षेत्रात माझे व्यावसायिक हितसंबंध आहेत.”
ते पुढे म्हणाले, “अदाणी समूहाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणं योग्य नाही. पण माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि त्याला राजकीय मुद्दा बनवणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी माझ्या नागरिकत्वाबद्दल आधीच सांगितले आहे. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही.”