पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्विटरचे सीईओ तसंच टेस्लाचे एलॉन मस्क यांची भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आम्हा दोघांची भेट झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मी जी चर्चा केली ती खूपच सकारात्मक स्तरावर झाली. तसंच पुढच्या वर्षी मी भारतात येण्याचाही विचार करतो आहे. मोदींच्या भेटीनंतर मी त्यांचा फॅन झालो आहे असंही एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि मस्क यांची भेट महत्त्वाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये मस्क यांच्या कॅलिफोर्निया या ठिकाणी असलेल्या टेस्ला मोटर्सच्या फॅक्टरीतही त्यांना भेटले होते. त्यावेळी मस्क हे ट्विटरचे सीईओ नव्हते. बुधवारी या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. टेस्ला मोटर्स ही कंपनी भारतात कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने जागेच्या शोधात आहे. त्या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
एलॉन मस्क यांनी काय म्हटलं आहे?
“मी पुढच्या वर्षी भारताचा दौरा करण्याचा विचार करतो आहे. टेस्ला लवकरच भारतात येईल ही माझी खात्री आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. भविष्यात आम्ही मोठी घोषणा करु. भारतात गुंतवणूक करणं हे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि माझी सकारात्मक आणि चर्चा झाली.” या आशयाचं वक्तव्य मस्क यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा महत्त्वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून रोजी अमेरिकेत पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा न्यूयॉर्कला पोहचले तेव्हा त्यांचं स्वागत करत अनेक अनिवासी भारतीयांनी मोदी-मोदी चा गजर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतल्या ज्या हॉटेलबाहेर थांबले आहेत त्या ठिकाणीही अनिवासी भारतीय त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातली महासत्ता मानल्या गेलेल्या अमेरिकेत आहेत. अमेरिका २२ जून रोजी त्यांच्यासाठी रेड कार्पेट पसरवून स्वागत करणार आहे. असा सन्मान मिळालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे नेते ठरले आहेत. याआधी इमॅन्युअल मॅक्रॉन आणि यूनन सुक येओल यांना हा राजकीय सन्मान देण्यात आला होता. जो बायडेन यांनी या दोघांचं ज्या प्रमाणे स्वागत केलं तसंच ते आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही स्वागत करणार आहेत.