मी अतिशय प्रामाणिक माणूस आहे. माझ्यावर विनाकारणच टीका करण्यात येत असल्याची भावना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी व्यक्त केली. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि जावई गुरुनाथ मयप्पन याला सट्टेबाजीच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर श्रीनिवासन यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. बिहार क्रिकेट असोसिएशनने त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने श्रीनिवासन यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पदभार स्वीकारण्यास मंजुरी दिली. या सर्व पार्श्वभूमीवर ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवासन यांनी गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर भाष्य केले.
ते म्हणाले, मी खरंच खूप प्रामाणिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदभार स्वीकारण्याची परवानगी दिल्यानंतर मला खूप आनंद झाला. जे लोक मला पूर्वीपासून ओळखतात, त्यांचा मी काय सांगतो यावर विश्वास बसेल. मी सातत्याने पुढे काय करायचे, यावर लक्ष केंद्रित करीत असतो. मनापासून पटत नाही, तोपर्यंत मी कोणतीही गोष्ट स्वीकारत नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट घडल्यानंतर मी त्याच्या सामना करतो आणि पुढे जात राहतो.
लोकमत काय आहे, याचा मी जास्त विचार करीत नाही. त्याचा माझ्यावर विशेष परिणामही होत नाही. ज्यावेळी मी बीसीसीआयचा अध्यक्ष नव्हतो, त्यावेळी माझ्यावर लिहिलेल्या एका ओळीचा मी विचार केला नाही, आता २० ओळींचा कशाला करू, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Story img Loader