निवडणुकीचे ढोल-ताशे वाजू लागले आहेत. नेत्यांचे कलगीतुरे सुरू झाले आहेत. जे बोलायचे त्यापेक्षा अधिक लपवायचे ‘चालू’ खेळही रंगू लागले आहेत. नेत्यांच्या या खेळाचे छुपे अर्थ सुस्पष्ट करणारा प्रासंगिक स्तंभ-
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची साथ कायम ठेवणार असल्याचा निर्वाळा देतानाच राहुल गांधी यांच्याबरोबर काम करणार नाही हे स्पष्ट केले. पवार यांच्यासारख्या पाच दशकांचा सक्रिय राजकारणाचा अनुभव पाठीशी असलेल्या नेत्याला त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा वयाने कमी असलेल्या नेत्याच्या हाताखाली काम करणे केव्हाही योग्य वाटणार नाही, हे आहेच. परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल पवार यांच्या मनात असलेली अढी कधीच लपून राहिलेली नाही. गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यावरही पवार यांनी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली होती वा त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलही त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्या मनातही राष्ट्रवादी नेतृत्वाबद्दल फार प्रेमाची भावना आहे, असे नाही. नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नाही या पवार यांच्या विधानाचा अर्थ मात्र वेगळा आहे. सध्या काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे. काँग्रेसच्या जागा कमी होतील, असा सर्वच निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. याचाच अर्थ पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांनंतर काँग्रेस किंवा यूपीएचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हेच पवार यांना यातून सूचित करायचे असावे. नाही तरी काँग्रेसला धोबीपछाड घालण्याची एकही संधी पवार किंवा राष्ट्रवादीचे अन्य नेते सोडत नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाल्यास राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचीच वातावरणनिर्मिती पवार आतापासून करीत नाहीत ना, असा शंकेचा सूर काँग्रेस नेत्यांच्या मनात घोळत आहे.