ललित मोदी यांना पोर्तुगालमध्ये जाण्यासाठी प्रवासविषयक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी शिफारस मी ब्रिटन सरकारकडे केलेली नव्हती. केवळ ललित मोदी यांच्या पत्नीचा विचार करून ब्रिटन सरकारने त्यांच्या नियमानुसार ललित मोदी यांना प्रवासविषयक कागदपत्रे उपलब्ध करून दिली. तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होणार नाही, एवढाच संदेश पाठविला होता, असा खुलासा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला. भारतीय नागरिक असलेल्या एखाद्या आजारी महिलेची मदत करणे, हा गुन्हा असेल, तर तो मी केला आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले. ललित मोदींसाठी ब्रिटन सरकाकडे मी शिफारस केल्याचा एकतरी कागद, ई-मेल दाखवा, असे आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले.
आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा आरोप करीत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या विषयावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले असून, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. लोकसभेमधील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांच्या २५ खासदारांना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. लोकसभेतील या कोंडीच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी गुरुवारी निवेदन सादर करून आपली बाजू मांडली.
त्या म्हणाल्या, ललित मोदी यांना पोर्तुगालमध्ये जाण्यासाठी प्रवासविषयक कागदपत्रे उपलब्ध करून द्यायची की नाही, याचा निर्णय ब्रिटन सरकारने घ्यावा, असेच मी माझ्या संदेशात म्हटले आहे. केवळ त्यांनी परवानगी दिली, तर त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी भूमिका मी मांडली होती. त्याचवेळी ब्रिटनमधील गृह मंत्रालयाने हा निर्णय त्यांच्या देशातील नियमांप्रमाणेच घेतला असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सुषमा स्वराज यांनी केलेल्या शिफारशीमुळे हा निर्णय घेतल्याचे ब्रिटन सरकारने म्हटलेले नाही, असे संबंधित वृत्तपत्रातील मुलाखतीचा दाखला देत सुषमा स्वराज यांनी सांगितले.
माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱय़ा विरोधकांनी मी आधी काय गुन्हा केला आहे, हे तरी सांगावे, असे सांगून त्या म्हणाल्या, या विषयावर संसदेमध्ये चर्चा घडवून यावी, यासाठी मी स्वतः दोन्ही सभागृहांच्या महासचिवांकडे निवेदन दिले होते. चर्चेसाठी मी तयार आहे. मात्र, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे आधीचे दोन आठवडे वाया गेले. उद्या तिसरा आठवडाही संपत आहे. या पार्श्वभूमीवर मला माझी बाजू मांडण्याची संधीही न मिळणे अन्यायकारक आहे. म्हणूनच मी आज स्वतःहून हे निवेदन करीत आहे, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
माध्यमांमधून अपप्रचार
गेल्या दोन महिन्यांपासून माध्यमांमधून या विषयावर माझ्याविरुद्ध अपप्रचार करण्यात येतो आहे. त्यावर सभागृहातच सविस्तर उत्तर द्यावे, असे मी ठरवले होते आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची मी वाटच बघत होते, असे त्यांनी सांगितले.
तर सोनिया गांधींनी काय केले असते
ललित मोदी यांच्या पत्नीला झालेला कर्करोग गंभीर असून, त्यांच्या जिवालाही त्यामुळे धोका असल्याचे पोर्तुगालमधील रुग्णालयाने म्हटले आहे. या स्थितीत मानवी दृष्टिकोनातून विचार केल्यास माझ्या जागी सोनिया गांधी असत्या, तर त्यांनी काय केले असते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा