गुजरातच्या विकासाचा ढोल बडवणाऱ्या मोदींनी समाजातील सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्या होत्या. तसे केले असते तर गुजरातचे ‘औद्योगिक विकासाचे मॉडेल’ एक चांगला पर्याय ठरले असते. अशी कोपरखळी बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांनी मारली. पाटना येथील गांधी मैदानावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर नितीशकुमार यांनी मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’चा खरपूस समाचार घेतला.
“जीडीपीमध्ये वाढ झाल्यावर त्याचा फायदा समाजातील एका विशिष्ट वर्गालाच होतो. त्यामुळे जीडीपीच्या वधारण्यावर विकासाचे मोजमाप करणे चूकिचे आहे. विकास हा सर्वसमावेशक असायला हवा. समाजातील सर्व थरातील लोकांचा त्यामध्ये सहभाग असायला हवा. सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करणारे मॉडेलच विकासाचे खरे मॉडेल आहे”, असे नितीशकुमार आपल्या भाषणात म्हणाले.
विकासाची फळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवणाऱया सर्वसमावेशक व सामाजिक न्यायाचा अंर्तभाव असलेले विकासाचे मॉडेल बिहारने स्विकारले आहे. त्यामुळे गरीब व श्रीमंत, दलित, आदिवासी, उच्चवर्णीय व इतर मागास वर्गीय यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात बिहारला यश आले असल्याचं ते पुढे म्हणाले.
“आपल्याला राज्याच्या महान संस्कृती बद्दल अभिमान आहे. इतिहासापासूनच बिहारला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. वैशाली, नालंदा आणि विक्रमशिला ही शैक्षणिक केंद्र बिहारमध्ये आहेत, “असे नितीशकुमार आपल्या भाषणामध्ये
म्हणाले.

Story img Loader