दिल्ली पोलीस केवळ दिल्लीकरांकडून लाच गोळा करून ते आयुक्तांमार्फत गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात, असा घणाघाती आरोप करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना पोलीसांच्या मनमानीविरोधात दहा दिवस धरणे धऱण्याच्या तयारीने येण्याचे आवाहन केले.
दिल्लीतील कायदेमंत्री सोमनाथ भारती यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱया चार पोलीस अधिकाऱयांचे निलंबन करण्याची मागणी केजरीवाल यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली होती. सोमवारपर्यंत या चौघांना निलंबित केले नाही, तर सोमवारी सर्व मंत्र्यांसोबत आपण उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला होता. उपोषणाला बसण्यासाठी निघालेले असतानाच केजरीवाल यांना रेल भवनाजवळ अडविण्यात आले. त्यानंतर तिथेच त्यांनी आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात केजरीवाल म्हणाले, मला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये कोणतीही अडचण आणायची इच्छा नाही. मात्र, दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नसताना मी शांत राहू शकणार नाही. दिल्ली पोलीसांच्या गैरवर्तणुकीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीसोबत दिल्ली सरकार कोणतेही सहकार्य करणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपल्या धरणे आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी कोणता गोंधळ झाला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असे स्पष्ट करून या संपूर्ण प्रकाराला पंतप्रधान आणि केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा