पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजपसह संघ परिवाराने नेपथ्यरचना केली असतानाच दस्तुरखुद्द मोदी यांनीच आपण या पदाची स्वप्ने पाहात नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिक्षकदिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी गुजराती जनतेने आपल्याला २०१७ पर्यंत गुजरातची सेवा करण्यासाठी निवडले असल्याचे स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रचंड घुसळण सुरू आहे. मोदींचे पक्षांतर्गत विरोधक व समर्थक या विषयावर तावातावाने आपली मते मांडत आहेत. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच पुढाकार घेऊन भाजपसह परिवारातील सर्वच संघटनांची बैठक आयोजित केली आहे. या सर्व नेपथ्यरचनेलाच सुरूंग लावण्याचे काम मोदींनी केले आहे. येथील एका कार्यक्रमात त्यांनी आपण पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात नसल्याचे स्पष्ट केले.
पुढील वर्षी पंतप्रधान म्हणून या कार्यक्रमाला पुन्हा याल का, या एका विद्यार्थ्यांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी यांनी पंतप्रधानपदाबद्दल वरील वक्तव्य केले. गुजरातच्या जनतेने २०१७ पर्यंत आपल्याला सेवेची संधी दिली आहे. तेव्हा त्यांना दिलेल्या वचनाची पूर्तता करणे हे माझे इष्टकर्तव्य ठरत असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार?
तुम्हाला भविष्यात काय व्हायचे आहे याची स्वप्ने पाहण्यापेक्षा भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार करणे अधिक चांगले ठरते असे सांगत मोदींनी पंतप्रधानपदाबाबत अधिक काही न बोलणेच पसंत केले. या कार्यक्रमात मोदींसमवेत व्यासपीठावर राज्यपाल कमला बेनिवाल होत्या. वादग्रस्त ठरलेले लोकायुक्त विधेयक राज्यपालांनी परत पाठवल्याने दोघांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्याची कल्पना कुठून सुचली असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने विचारताच, प्रत्येक देशाने आपल्याला प्रेरणादायी ठरेल असे काही तरी भव्यदिव्य उभे केले आहे. मात्र स्वातंत्र्यापासून आपल्याकडे असे काहीच उभारले गेले नाही, अशी खंत मोदींनी व्यक्त केली.
गुजरात दंगल  हा मोदींच्या कारकिर्दीवरील डाग : पर्रिकर
पणजी : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तपास यंत्रणांनीदेखील त्यांना निदरेष ठरवले असले तरी गुजरात दंगल मोदींच्या राजकीय कारकिर्दीला लागलेला एक डाग असल्याचे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. २००२ मध्ये वृत्तवाहिन्यांवर हिंदू भाविकांचे मृतदेह दाखविले गेल्यानंतर जनमत खवळले होते. त्यानंतर झालेला हिंसाचार आटोक्यात ठेवणे प्रशासनाचे मुख्य काम होते. मोदींनी तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा कारभार नव्याने हाती घेतला होता. त्यांच्या जागी मी असतो तर हा प्रकार होऊ दिला नसता, असे ते म्हणाले.
नेतृत्वाचा वाद महाग पडेल !