पंतप्रधानपदाचे प्रबळ दाववेदार असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरील गुजरात दंगलीचा बट्टा पुसून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाच विरोधक मात्र याच मुद्दय़ावर त्यांची सातत्याने कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता यात नोबेल पारितोषिकविजेते व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची भर पडली आहे. ‘एक भारतीय नागरिक म्हणून मला देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांना पाहण्याची अजिबात इच्छा नाही’, अशा जळजळीत शब्दांत सेन यांनी मोदींवर टीका केली आहे.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमर्त्य सेन यांनी मोदी यांच्याविषयी परखड मते मांडली. अल्पसंख्याकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत. २००२मध्ये अल्पसंख्याकांच्या विरोधात झाला तो संघटित हिंसाचार होता. मोदी यांना पंतप्रधानपदी बसवून अल्पसंख्याकांत असुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी परिस्थिती पुन्हा देशात निर्माण होणे परवडणारे नाही, असे सेन म्हणाले.
गुजरातमधील विकासाच्या प्रारूपासंदर्भातही सेन यांनी परखड मते नोंदवली. गुजरातमध्ये वरकरणी भौतिक विकास झाल्याचे दिसून येत असले तरी मोदींनी फारसे काही केल्याचे दिसत नसल्याचे सेन यांनी स्पष्ट केले. आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय म्हणता येईल असे ठोस कार्यक्रम राबवले नाहीत. अल्पसंख्याकांशी आपण सापत्नभावाने वागत नसल्याची भावना मोदींनी बहुसंख्याकांच्या मनात रुजवली असली तरी विकासाच्या बाबतीत मात्र हा समाज असंतुष्टच राहिला असल्याचे सेन म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont want modi as my pm amartya sen
Show comments