मेघालयचे भाजपा प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी यांनी गोमांसाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मावरी म्हणाले की, मी गोमांस खातो आणि माझ्या पक्षाला यावर कोणताही आक्षेप नाही. इंडिया टुडे एनईशी बोलताना मावरी यांनी असा दावा केला आहे. मावरी म्हणाले की, “मेघालयमध्ये सर्वजण गोमांस खातात. गोमांसावर राज्यात कोणत्याही प्रकारची बंदी नाही. गोमांस खाणं ही आमची संस्कृती आणि सवय दोन्ही आहे”. यावेळी मावरी यांनी गोहत्येबाबत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर भाष्य केलं.
मावरी म्हणाले की, “आम्ही आमच्या जेवणाच्या सवयी फॉलो करतो. तसेच राज्यात अशी काही बंदी नाही. गोमांस खाण्याबाबत आमच्याकडे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. भाजपा कोणत्याही जात, पंथ, धर्माचा विचार करत नाही. आम्हाला हवे ते आम्ही खाऊ शकतो, आमच्या सवयी आम्ही फॉलो करतो. यावर एखाद्या राजकीय पक्षाला अडचण का असावी?”
हे ही वाचा >> “जास्त हुंडा पाहिजे” म्हणत नवरदेव मंडपात आलाच नाही; सजून बसलेल्या नवरीने थेट…
मेघालयमध्ये त्रिशंकू परिस्थिती?
मेघालयमधील विधासभा निवडणुकीआधी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या विजयाचा दावा केला आहे. मावरी म्हणाले की, राज्यातल्या सर्व ६० मतदार संघात आमचा पक्ष उमेदवार देणार आहे. मावरी म्हणाले की, पार्टी हाय कमांडला राज्यात भाजपाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. आगामी निवडणुकीत मेघालयमध्ये भाजपा, एनसीपी आणि यूडीपीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही.