पाकिस्तानमध्ये नाट्यमय घडोमोडी घडताना दिसत आहेत. आज पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्यानंतर, देशाला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे. माझ्याविरोधात परकीय षड्यंत्र रचले जात असल्याचे त्यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. याचबरोबर देशातील जनतेने आता नव्या निवडणुकीची तयारी करावी, असे देखील इम्रान खान यांनी म्हटले आहे.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ”सगळ्या जनतेसमोर एक देशद्रोह होत होता, देशद्रोही बसलेले होते आणि षडयंत्र रचलं जात होतं. मी त्यांना संदेश देऊ इच्छितो, अल्लाहचं जनतेकडे लक्ष आहे. अशाप्रकारचं षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आज आपल्या अधिकारांचा वापर करून जो निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सूचना पाठवली आहे. की सभागृह विसर्जित करा. एका लोकशाही समाजात आपण लोकशाही जनतेकडे जावं, निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल.”
तसेच, ”पैशांच्या बळावर या देशाच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. त्यांचा सर्व पैसा वाय जाईल. जनतेने हा निर्णय घेतलेला आहे आणि मी जनतेला आज सांगतोय की निवडणुकीची तयारी करा, तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही बाहेरच्या सत्ताधीशांनी किंवा भ्रष्टाचाऱ्यांनी हा निर्णय नाही घ्यायचा की, या देशाचं भवितव्य काय असेल. माझी सूचना जेव्हा राष्ट्रपतींकडे जाईल आणि सभागृह बरखास्त होईल आणि त्यानंतरची कार्यवाही सुरू होईल. मी जनतेचे अभिनंद करतो आणि अल्लाहचे आभार व्यक्त करतो, की एवढं मोठं षडयंत्र जे रचलं जात होतं. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रयत्न आज अयशस्वी ठरला आहे.” असंही इम्रान खान यांनी बोलून दाखवलं आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी परदेशी षडयंत्र असल्याचा आरोप करत यांनी अविश्वास ठराव फेटाळला आणि सभागृहात मतदान होऊ दिले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. संसदेची पुढील बैठक २५ एप्रिल रोजी होणार आहे.