जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्य नेते फारूक अब्दुल्ला यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकारची घोषणा केल्यासंदर्भात भाष्य करताना अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान योग्यपद्धतीने शासन करेल अशी अपेक्षा आहे, असं मत व्यक्त केलंय. भाजपाने आता याच वक्तव्यावरुन अब्दुल्ला यांच्यावर टीका केलीय.

नक्की वाचा >> अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकाला हवीय भारताची मदत; डोवाल यांच्याकडे केली विचारणा

श्रीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर अब्दुल्ला प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी, “मला अपेक्षा आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबान इस्लामिक नियमांच्या आधारावर चांगल्या पद्धतीने शासन करेल आणि मानवाधिकारांचा सन्मान त्यांच्याकडून राखला जाईल. त्यांनी सर्व देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले पाहिजेत,” असं मत व्यक्त केलं.

तालिबानसंदर्भात अब्दुल्ला यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केलीय. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते निर्मल सिंह यांनी तालिबानकडून महिला आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार केला जात असतानाच अब्दुल्ला मात्र त्यांची बाजू घेताना दिसत असल्याची टीका केलीय. ज्या देशांमध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक आहेत त्या देशात अब्दुल्ला यांना सर्व धर्म समभाव हवा आहे आणि जिथे मुस्लीम बहुसंख्यांक आहेत तिथे त्यांना इस्लामिक कायदे हवेत, असा टोला सिंह यांनी लगावला आहे. यापूर्वीही अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन वाद झालेत.

नक्की वाचा >> “PhD, Master’s सारख्या पदव्या महत्वाच्या नाहीत, आमच्या नेत्यांकडे…”; तालिबानच्या शिक्षणमंत्र्यांचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील पुढील विधानसभा निवडणूक नॅशनल कॉन्फरन्स जिंकणार असं म्हटलं होतं. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपला पक्ष निवडणुकांमध्ये सहभागी होणार असल्याचे संकेत दिलेत. त्यांनी यापूर्वी झालेल्या दोन महत्वाच्या निवडणुकांमध्ये पक्षाने उमेदवार दिले नसल्याची खंतही बोलून दाखवली.

नक्की वाचा >> दहशतवादी ते राष्ट्रप्रमुख… तालिबानने अफगाणची सत्ता ज्याच्या हाती दिली तो हसन अखुंद आहे तरी कोण?

जम्मू काश्मीरमधील २०१८ च्या पंचायत निवडणूका आणि २०१९ मध्ये खंड विकास परिषदेच्या निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने एकही उमेदवार दिला नव्हता. त्याच मुद्द्यावरुन त्यांनी ही खंत व्यक्त केली.

Story img Loader