Donald Trump and Giorgia Meloni Meet : अमेरिकेने अनेक देशांवर आयात शुल्क लादल्यामुळे या देशांनी अमेरिकेवर टीका केलेली असताना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनी यांचं कौतुक केलं आहे. तसंच, आयात शुल्कावर चर्चा करायला आलेल्या त्या पहिल्या युरोपीय नेत्या असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिका आणि युरोपिअन युनिअनमध्ये सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती. ओव्हल ऑफिसमधील भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी इटालिअन समकक्षांचे कौतुक केले. तसंच, त्यांनी दिलेले रोम भेटीचे आमंत्रणही स्वीकारले आहे. ते म्हणाले, “जॉर्जिया मेलोनी मला खूप आवडतात. मला वाटतं की त्या एक उत्तम पंतप्रधान आहेत. त्यांनी इटलीमध्ये खूप चांगलं काम केलंय.”
“मला माहित होते की त्यांच्याकडे उत्तम प्रतिभा आहे, त्या जगातील खऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. देश म्हणून आमच्यात चांगले संबंध आहेत”, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
मेलोनी काय म्हणाल्या?
मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या युरोपियन युनियन निर्यातीवर २० टक्के कर लादण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. आयात शुल्काचा हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी थांबवला आहे. अमेरिका आणि इटलीत व्यापार वाद सुरू असतानाही जॉर्जिया मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. “मी त्यांना एक विश्वासार्ह भागीदार मानले नसते तर मी इथे नसते”, असं मेलोनी म्हणाल्या.
Lavorare insieme per costruire un Occidente più forte.
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) April 17, 2025
Oggi a Washington ho incontrato il Presidente @realDonaldTrump. Un confronto leale e costruttivo su temi strategici: dalla sicurezza alla difesa, dalla lotta all’immigrazione illegale ai rapporti commerciali.
Ho colto… pic.twitter.com/VU3qNsUe5X
अनेक मुद्द्यांवर समान भूमिका
मेलोनी आता उद्या अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत टॅरिफ आणि संरक्षण खर्च यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते आणि कदाचित “पश्चिमेला पुन्हा महान बनवण्याचे” मार्ग शोधले जाऊ शकतात. २० जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या त्या एकमेव युरोपीय नेत्या होत्या. अमेरिकन अधिकाऱ्यांनी नमूद केले की स्थलांतर आणि युक्रेनसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी राष्ट्रपतींशी समान भूमिका मांडली.