प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात, परंतु भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे आपले पती असल्याचा दावा करणाऱ्या जशोदाबेन (६२) या निवृत्त शिक्षिकेच्या बाबतीत मात्र त्या मोदी यांच्या पाठीशी असून नसल्यासारखीच परिस्थिती आहे. अहमदाबाद येथे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीतून हेच रखरखीत वास्तव अधोरेखित झाले. प्रसिद्धीपासून दूर, राजकीय उन्हाळ्या-पावसाळ्यांबद्दल पूर्णत: अनभिज्ञ अशा जशोदाबेन यांनी मुलाखतीच्या वेळी छायाचित्र काढण्यास मात्र नकार दिला.
१७ वर्षांच्या असताना त्यांचा मोदी यांच्याशी विवाह झाला होता. तीनच वर्षांनी त्या मोदी यांच्यापासून विभक्त झाल्या. त्याबद्दल त्या सांगतात, ‘‘विवाह झाला आणि मी शिक्षण सोडले. सासरी राहायला गेले. मी शिक्षण पूर्ण करावे, असा त्यांचा आग्रह होता. त्या तीन वर्षांत एकूण तीन महिनेच आम्ही एकत्र होतो. आमच्यात कधीही भांडण झाले नाही. दोघांनी पूर्ण विचारांती स्वेच्छेने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजवर त्यांनी संपर्क साधलेला नाही.’’
मोदी यांनी तुम्हांला सोडून जात असल्याचे कधी सांगितले का, असे विचारता जशोदाबेन म्हणाल्या, ‘‘मी देशभर भटकंती करतो. मनात येईल तेथे जातो. तेथे माझ्याबरोबर येऊन तुम्ही काय करणार, असा सवाल त्यांनी एकदा मला केला होता. त्यानंतर मी वडनगर येथे सासरी वास्तव्याला गेले. त्यावर, शिक्षण सोडून का आलात, असे त्यांनी मला विचारले होते. त्यांना सोडण्याचा निर्णय  मीच घेतला. मोदी माझ्याशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्या राजकीय विचारसरणीबाबत कधीही बोलले नाहीत. त्यांचा बराच वेळ संघाच्या शाखेतच जात असे. त्यामुळे कालांतराने आपण सासरी जाणे बंद केले आणि माहेरी निघून आलो.’’
‘‘मोदी यांच्याबाबतच्या बातम्या मी वृत्तपत्रात आणि वाहिन्यांवर आवडीने पाहते. मात्र मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. ते संपर्क साधतील अशी शक्यताही नाही. त्यांच्या मार्गात अडसर  ठरेल असे कोणतेही वर्तन माझ्या हातून होणार नाही. इच्छित कार्यात त्यांची प्रगती होवो, अशाच माझ्या सदिच्छा आहेत. एक दिवस ते पंतप्रधान होतील, याची मला जाणीव आहे,’’ असेही जशोदाबेन म्हणाल्या.  
सध्या त्या भावांकडेच राहतात. त्यांना दरमहा १४ हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. सध्या इयत्ता पाचवीपर्यंतच्या मुलांना मी सर्व विषय शिकविते. भल्या पहाटेच उठून अंबामातेची प्रार्थना करते, त्यानंतर शिकवणी घेते आणि उरलेला वेळ प्रार्थनेत घालविते. कधीतरी दुसऱ्या भावांच्या घरी जाऊन त्यांची खुशाली विचारतो, असे त्यांनी सांगितले.    
..तर तुम्ही येथे आला असता का?
आपण अद्यापही मोदींच्या कायदेशीर पत्नी आहात का? असे विचारता, त्या म्हणाल्या, ‘‘प्रत्येक वेळी लोक त्यांचेच नाव घेतात. काही वेळा त्यांच्याशी माझे नावही जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मी त्यांची पत्नी नसते तर तुम्ही माझा शोध घेत आला असता का? माझ्याशी चर्चा केली असती का?’’ एकदा झालेल्या विवाहाचा अनुभव आला होता, त्यामुळे पुनर्विवाहास मन धजावले नाही, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा