जम्मू-काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांना यूकेच्या संसदेत डायव्हर्सिटी ॲम्बेसेडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात याना मीर यांनी जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या प्रचाराचा प्रतिकार करणारे जहाल भाषण केलं. हे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. या व्हिडीओत त्यांनी पाकिस्तान आणि मलाला युसूफझाई यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे.
युकेतील जम्मू आणि काश्मीर स्टडी सेंटरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात याना मीर म्हणाल्या, “मी मलाला युसुफझाई नाही. कारण मी भारताचा भाग असलेल्या माझ्या जन्मभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आणि स्वतंत्र आहे. माझ्या जन्मभूमीपासून पळून जाऊन मी तुमच्या देशात (यूके) आश्रय घेतलेला नाही. मी मलाला युसुफझाई कधीही होऊ शकत नाही.”
याना मीर पुढे म्हणाल्या, “मी सोशल मीडिया आणि परदेशी मीडियामधील अशा सर्व टूलकिट सदस्यांवर आक्षेप घेते, ज्यांनी कधीही भारतात काश्मीरला भेट देण्याची पर्वा केली नाही परंतु दडपशाहीच्या कथा रचल्या. मी तुम्हाला धर्माच्या आधारावर भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवण्याची विनंती करते. आम्ही तुम्हाला आमचे तुकडे करू देणार नाही”, अशा कडक शब्दांत तिने पाकिस्तानला इशारा दिला. तसंच, आमच्या मागे येणं थांबवा आणि माझ्या काश्मीर समुदायाला शांततेत जगू द्या, असंही त्या पुढे म्हणाल्या.
याना मीर यांना संसदेतील दोन्ही खासदार बॉब ब्लॅकमन आणि वीरेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत यूकेच्या खासदार थेरेसा व्हिलियर्स यांच्याकडून डायव्हर्सिटी ॲम्बेसेडर पुरस्कार मिळाला. वीरेंद्र शर्मा हे लंडनजवळील इलिंग साउथहॉल येथील ब्रिटिश-भारतीय खासदार आहेत.
माझ्या देशाची बदनामी करणं थांबवा
जम्मू आणि काश्मीर स्टडी सेंटर (JKSC), UK ने लंडनमधील संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ‘भारताचा संकल्प दिवस’ आयोजित केला होता. JKSC ही एक थिंक टँक आहे जी जम्मू आणि काश्मीर आणि त्याभोवतीच्या समस्यांचा अभ्यास करते. याना मीर, ‘संकल्प दिवस’ वर आपल्या भाषणात म्हणाल्या, “यूके आणि पाकिस्तानमध्ये राहणारे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय मीडिया आणि मानवाधिकार मंचांवर माझ्या देशाची बदनामी करणे थांबवतील. आमच्या मागे येणं बंद करा. हजारो काश्मिरी मातांनी दहशतवादाच्या कृत्यांमुळे आपले पुत्र गमावले आहेत.”