मी दारूच्या एका थेंबालाही आजवर स्पर्श केलेला नाही. माझ्या भावाला आलेल्या अनुभवांतून मी शिकलो. तो दारूच्या आहारी कसा गेला आणि त्यातच त्याचा अंत कसा झाला हे सांगताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डोळे पाणावले. खरेतर लहान मुले असोत किंवा तरूण कोणीही अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नका. अंमली पदार्थांच्या आहारी जाणे गैर आहे हे डोनाल्ड ट्रम्प टेलिप्रॉम्पटर वाचून सांगत होते. अचानक प्रॉम्पटर थांबला आणि डोनाल्ड ट्रम्प भावनिक झाले. त्यानंतर त्यांचा आवाजही काहीसा कातर झाला. तुम्हाला माझ्या भावाबाबत मी सांगतो आहे, फ्रेड हा माझा भाऊ दिसायला देखणा, उंच त्याचे व्यक्तिमत्त्वही छाप पाडणारे होते.

फ्रेड माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत उजवा होता. मात्र त्याला दारू पिण्याचे व्यसन जडले. मी त्याचे म्हणणे कायम ऐकत असे. डोनाल्ड तू कधीही दारूला हातही लावू नकोस असे तो मला कायम सांगायचा आणि मी ते ऐकले. फ्रेड वैमानिक म्हणून काम करत होता. पण १९८१ मध्ये दारूच्या आहारी जाऊन झालेल्या दीर्घ आजारात त्याचा मृत्यू झाला. तो वारला तेव्हा त्याचे वय अवघे ४३ वर्षे होते. माझा भाऊ वारला तो प्रसंग आमच्या कुटुंबासाठी सर्वात दुःखाचा होता. त्या घटनेपासून मी धडा घेतला आणि कधीही दारूला स्पर्श केला नाही तसेच धूम्रपानही केले नाही अशी आठवण डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली. ‘शिकागो ट्रिब्यून’ या वेबसाईटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

माझ्या भावाच्या मृत्यूचा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. त्याचमुळे आजवर एकदाही दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही. गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. माझे माझ्या भावावर खूप प्रेम होते. त्याच्या जाण्याचे मला अतीव दुःख झाले. मी त्याचे कायम ऐकायचो तो मला मार्गदर्शन करायचा. मी त्याचे कोणतेही म्हणणे टाळले नाही. मात्र त्याला जडलेल्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे कसे नुकसान झाले हे मी पाहिले आहे अनुभवले आहे. त्याच्या मृत्यूला ३० पेक्षा जास्त वर्षे झाली मात्र आजही तो प्रसंग आठवला की मला वाईट वाटते आणि त्याच्या जाण्याचे कारण दारूचे व्यसन होते हे आठवते असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.