मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील, ते स्वतः, श्रीकांत शिंदे आणि नातू अशा चार पिढ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिला आणि बऱ्याच गप्पा मारल्या असंही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं. या भेटीमागचं कारण काय? हे देखील त्यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“आज संपूर्ण कुटुंबासह मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. ही भेट खूप चांगल्या पद्धतीने झाली. आम्हाला पंतप्रधान मोदींनी बराच वेळ दिला. मी यासाठी त्यांचा आभारी आहे. या दरम्यान राज्यात काय काय घडतं आहे? या विषयीही आम्ही चर्चा केली. पाऊस आणि इर्शाळगड यासंबंधीही आम्ही चर्चा केली.” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं.

धारावीचा प्रकल्प आहे त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाला तर लोकांचं जीवनमान उंचावेल त्यामुळे तो लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच पुनर्विकासाचे जे प्रकल्प आहेत त्यालाही चालना देण्याविषयी चर्चा झाली. माझ्या कुटुंबाची इच्छा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटावं त्यानुसार आम्ही त्यांची वेळ घेतली होती. माझ्या वडिलांशीही त्यांनी गप्पा मारल्या. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या नातवालाही काही प्रश्न विचारले आणि त्याच्यासह गप्पाही मारल्या असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

आज आई हवी होती असं वाटतं आहे

आज आमच्या चार पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझी आई हवी होती असं मला आवर्जून वाटतं आहे. माझे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंदी झाले आहेत. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना सांगितलं. माझ्या वडिलांना आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं ही त्यांचीही इच्छा होती. आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या. पंतप्रधान मोदी माझ्या नातवाबरोबरही गप्पा मारल्या आणि खेळले त्याचाही मला विशेष आनंद आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I thank pm modiji for affectionately enquiring and sharing quality time with my family said cm eknath shinde scj