राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे भारतातील दुसरे हिटलर असल्याची टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. नरेंद्र मोदी व भागवत असे दोन दोन हिटलर देशात आहेत, अशा शब्दात दिग्गिराजांनी भाजप-संघावर हल्ला चढवला. भारत हे हिंदुराष्ट्रच आहे आणि हिंदुत्व हीच या राष्ट्राची अस्मिता आहे, असे विधान करणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भावनिक मुद्दय़ांच्या आधारे निष्पाप लोकांना फसविणे बंद करावे, असा सूर काँग्रेसने लावला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सरसंघचालकांची हिटलर अशा शब्दात संभावना केली. तसेच धर्माचे राजकारण करीत लोकांना बनविणे थांबवावे, असा टोलाही हाणला. ‘मला वाटलं देशात सध्या एकच हिटलर तयार होतो आहे. पण असं दिसतंय की आपल्याकडे एक नव्हे तर दोन-दोन हिटलर तयार होत आहेत. देवा आता तूच भारताचे रक्षण कर,’ अशी उपरोधिक ट्विप्पणी दिग्विजय यांनी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख न करता त्यांचीही ‘हिटलर’ अशा शब्दात संभावना करण्यात आली आहे.
मोहन भागवत यांना दिग्विजय सिंह यांनी काही सवालही केले आहेत. हिंदुत्व ही धार्मिक अस्मिता आहे का? हिंदुत्वाचा सनातन धर्माशी काही संबंध आहे का? इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन अथवा अन्य धर्ममूल्यांवर श्रद्धा असलेली मंडळीही हिंदूच ठरतात का? मोहन भागवत या प्रश्नांचे स्पष्टीकरण देतील काय? असे सवाल त्यांनी केले आहेत.
गीता, उपनिषदे आणि हिंदू धर्म
हिंदू किंवा हिंदुत्व हे शब्द वा या संकल्पनांना पुराणे, उपनिषदे, गीता किंवा वेदांमध्ये स्थान आहे का, त्यांचा उल्लेख तरी आहे का, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे. राष्ट्रीय संघाने धर्माच्या नावाखाली मूर्ख बनवणे थांबवावे, ज्या सनातन धर्माचा आम्हाला अभिमान आहे, तो धर्म सर्वाशीच सौहार्दतेने वागायला शिकवतो, असे मतही सिंह यांनी नोंदवले आहे.
काँग्रेस, समाजवादी पक्षाची टीका    
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिग्विजय यांच्या सुरात सूर मिसळला. ते म्हणाले की, संघाने देशात जातीयवाद पसरवला आहे. त्यामुळे दोन धर्मामध्ये सतत संघर्ष झाला. माजी केंद्रीयमंत्री मनीष तिवारी म्हणाले की, धार्मिक मुद्दय़ांना पुन्हा महत्त्व आले आहे. भाजपने धर्माचा पुरेपूर राजकीय वापर केला. पण भारत म्हणजे पाकिस्तान नव्हे, असा इशारा तिवारी यांनी दिला. भाजप व संघाचे नेते एकाच सुरात बोलतात. त्याचेच प्रतिबिंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात उमटले. हिंदुत्व ही एक संस्कृती आहे. भारतात राहणारे या संस्कृतीचे घटक आहेत, अशी व्याख्या सावरकरांनीं केल्याची आठवण शर्मा यांनी सांगितली.
भागवत काय म्हणाले?
विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित समारंभात मुंबई येथे सरसंघचालक मोहन भागवत यांचे रविवारी भाषण झाले. हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदुत्व हीच आपल्या राष्ट्राची खरी ओळख आहे. सर्व धर्माना सामावून घेण्याची त्यात क्षमता आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते.