IAS Tina Dabi News: आयएएस अधिकारी टीना डाबी या विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या त्या राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या जनता दरबार आयोजित करत असतात. मंगळवारी जिल्ह्यात त्यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी एका शेतकऱ्याने केलेल्या अजब मागणीमुळे त्यांना धक्काच बसला. सदर शेतकऱ्याने शेतातून घरी जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली. यासाठी शेतकऱ्याने लेखी पत्रही लिहून दिले. तसेच जनता दरबारात जेव्हा त्याने ही मागणी केली, तेव्हा सर्वच उपस्थित अधिकारी आश्चर्यचकीत झाले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

नेमके प्रकरण काय आहे?

जोरापूर गावात राहणाऱ्या मांगीलाल नामक शेतकऱ्याने ही मागणी केली होती. त्याचे शेत आणि घरादरम्यान जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे त्याने ही मागणी केली. शेत आणि घरादरम्यान असलेल्या रस्त्यात एका व्यक्तीने अतिक्रमण केले असल्याचे मांगलीलाचे म्हणणे होते. शेतात पिक उभे आहे, पण यायला-जायला रस्ताच शिल्लक नसल्यामुळे आता अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतातून घरी आणि घरातून शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मांगीलालने केली.

मांगीलालने पुढे म्हटले की, मागच्या तीन वर्षांपासून तो या अडचणीचा सामना करत आहे. शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. ज्यामुळे त्याला स्वतःच्या शेतातील पिकही काढता येत नाही. त्यामुळेच त्याने लेखी मागणीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन केले. जोपर्यंत रस्ता उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मला हेलिकॉप्टर द्या, असेही त्याने म्हटले.

मांगीलालची ही अजब तक्रार ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी लागलीच चौकशीचे आदेश दिले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, असे त्यांनी सुचविल्यानंतर मांगीलालच्या शेताची पाहणी करण्यात आली. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली. तीन दिवसांच्या आत अतिक्रमण बाजूला करून रस्ता मोकळा करून द्यावा, असे आदेशही या नोटीशीतून देण्यात आले.

उपजिल्हाधिकारी बद्रीनारायण यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, काही लोकांनी रस्त्यावर शेती करत मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे तक्रारदाराला ये-जा करायला मार्ग उरला नाही. ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले, तो सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. प्रशासनाने याआधीही या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते. मात्र त्यानंतरही त्यावर शेती घेतली गेली. आता दुसऱ्यांदा अतिक्रमण केल्यामुळे आम्ही दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I want a helicopter at doorstep farmers unusual request baffles ias tina dabi kvg