शीना आणि मिखाईल ही आमचीच मुले असून, ज्यांनी कुणी शीनाची हत्या केली आहे. त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी भावना इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती सिद्धार्थ दास याने व्यक्त केली. इंद्राणी पैशांसाठी काहीही करू शकते, असे सांगत शीना बोराच्या हत्येमागे तीच असल्याकडेही त्याने बोट दाखवले.
शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी इंद्राणी मुखर्जीसह तिघांना अटक केली आहे. सिद्धार्थ दास हेच शीना आणि मिखाईल यांचे वडील आहेत. त्यांनीही याची कबुली दिली आहे. इंद्राणी आणि मी ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहात असताना आम्हाला ही दोन मुले झाली. १९८९ मध्ये इंद्राणी मला सोडून गेली. त्यानंतर आमच्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क नाही, असे सिद्धार्थ दास याने म्हटले आहे. सध्या कोलकात्यामध्ये असलेल्या सिद्धार्थ दास याने एका बंगाली वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने इंद्राणी आणि आपल्यातील संबंधांबद्दल सांगितले.
शीनाची हत्या झाल्याचे मला वृत्तपत्रातूनच काही दिवसांपूर्वी कळले आणि धक्काच बसला, असे त्यांनी सांगितले. जेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोणत्याही पोलीस अधिकाऱयाने आपल्याला संपर्क केला नसल्याचेही सिद्धार्थ दास यांनी सांगितले. सिद्धार्थ दास आपल्या पत्नीसोबत गेल्या १७ वर्षांपासून दुर्गानगर भागात राहतात. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे.
१९८६ मध्ये इंद्राणी आणि मी एकत्रपणे शिलॉंगला शिकत होतो. त्यावेळी आमची ओळख झाली. त्यातून पुढे आम्ही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहू लागलो. आणि आम्हाला शीना व मिखाईल ही दोन मुले झाली, असे सिद्धार्थ दास याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा