नजीकच्या भविष्यात ब्रिटनमधील आशियाई वंशाच्या लोकांची भूमिका महत्त्वाची राहील. ते एक दिवस ब्रिटनचे नेतृत्व करतील, असा विश्वास इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी व्यक्त केला.
बुधवारी रात्री येथे झालेल्या वार्षिक ‘जीजी-२ लीडरशिप’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमातील भाषणात ते बोलत होते. कॅमेरून पुढे म्हणाले की, आशियाई वंशाच्या ब्रिटिश नागरिकाचे नाव इंग्लंड पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे मला एक दिवस ऐकायचे आहे.
मे २०१५ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. याचा ओझरता संदर्भ देत त्यांनी, अर्थात ही गोष्ट लगेच घडून येणार नसल्याचे नमूद केले. इंग्लंडच्या आजवरच्या यशात या भूमीत राहणाऱ्या प्रत्येक समाजातील व्यक्तीचा वाटा आहे; पण खरे सांगायचे तर आशियाई वंशाच्या लोकांचा हा खारीचा वाटा, सिंहाचा वाटा बनला पाहिजे. अल्पसंख्याक समाजातील मोजक्याच व्यक्ती देशातील महत्त्वाची पदे भूषवित आहेत, असेही ते म्हणाले.
देशातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये संचालक पदांवर, संसदेच्या महत्त्वाच्या पदांवर, खेळांचे व्यवस्थापक पदांवर, इतकेच नाहीतर उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशपदांवरही आशियाई वंशाच्या नागरिकांची ‘अनुपस्थिती’ जाणवण्याइतकी आहे आणि हे बदलले पाहिजे, अशी पुस्तीही त्यांनी या वेळी जोडली.
पश्चिमेत येऊन पूर्वेकडील लोकांनी आपले वर्चस्व गाजवण्याची वेळ आली आहे, पण त्याला अजून वेळ लागेल. तरीही आशियाई लोकांचा प्रभाव पाहता नजीकच्या भविष्यात ते इंग्लंडचे नेतृत्व करतील, असे नमूद करावेसे वाटते, असेही कॅमेरून यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
यंदाचा ‘मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार सन मार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामी रंगेर यांना प्रदान करण्यात आला. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घातल्याबद्दल कॅमेरून यांनी रंगेर यांचा ‘सवरेत्कृष्ट व्यावसायिक’ म्हणून गौरव केला. तर पश्चिम नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या डेम आशा खेमका यांना शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी ‘वुमन ऑफ द इयर’ म्हणून गौरवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा