Amit Shah childhood Name: लहानपणी प्रत्येकाला त्याच्या घरातले काहीतरी टोपण नावाने हाक मारत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही त्यांच्या लहानपणी टोपण नावाने हाक मारली जात होती. न्यूज१८ च्या रायजिंग भारत समिट २०२५ मध्ये अमित शाह यांनी लहानपणीच्या टोपण नावाचा किस्सा सांगितला आहे. “मी पाच वर्षांचा झाल्यानंतर माझ्या आत्याने मला व्यवस्थित नाव देण्याचा निर्णय घेतला. त्याआधी मला टोपण नावाने हाक मारली जात होती. माझा जन्म शरद पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे मला लहानपणी सर्व पूनम म्हणून हाक मारत होते”, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

ग्रामीण भागात लहानपणी असे टोपण नाव देण्याची पद्धत प्रचलित आहे, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

तसेच ११ वर्षांचे वय असताना कुटुंबातील लोक अमेरिकेला पाठविणार असल्यामुळे तुम्ही घरातून खरंच पळाला होता काय? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, भारत सोडण्याची मला इच्छा नव्हती. तसे काही कारणही नव्हते. मी इथेच राहणार आणि संघर्ष करणार.

इतर कोणत्या मुद्द्यावर केले भाष्य?

न्यूज१८ च्या समिटमध्ये बोलत असताना अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात आम्ही अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. वक्फ कायदा, सीएए, नक्षलवाद, ध्रुवीकरणाचे राजकारण आणि इतर अनेक विषयांवर काम सुरू आहे. “ध्रुवीकरणाची विचार विषारी आहेत. जे जे लोक ध्रुवीकरणाचे राजकारण करतात ते राष्ट्रविरोधी आहेत”, असेही ते म्हणाले.

या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी भारताच्या फाळणीवरही टीका केली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांमुळे देशाची फाळणी झाल्याचे ते म्हणाले. तसेच २०१३ साली लोकसभेच्या निवडणुका लागण्याच्या काही महिने आधी काँग्रेसने मतपेटीला चुचकारण्यासाठी वक्फ कायद्यात दुरूस्ती केली. आता नव्या विधेयकावर मुस्लीम समाजातील काही मूठभर नेते टीका करत आहते. सर्वोच्च न्यायालयात १५ एप्रिल रोजी यावर सुनावणी होईल.

तसेच संसदेत वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात भूमिका मांडली नाही. प्रियांका गांधींनी सभागृहात मतदान का केले नाही? काँग्रेससाठी हा मोठा विषय आहे, तर मग राहुल गांधी यांनी भाषण का केले नाही? एरवी राहुल गांधी आरोप करतात की त्यांना बोलू दिले जात नाही. वक्फ विधेयकावर त्यांच्या पक्षाला दिलेल्या संपूर्ण वेळेत ते कितीही बोलू शकले असते, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होत आहे, हे मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.