Osho : ओशो ( Osho ) आश्रमात राहिलेल्या एका महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. ही महिला यु.के. येथील आहे तिने एका मुलाखतीत हे सांगितलं की स्वतःला भगवान समजणाऱ्या ओशो रजनीश यांच्या आश्रमात मी वयाच्या सहाव्या वर्षी गेले होते. मला चाईल्ड सेक्स स्लेव्ह करण्यात आलं. या महिलेने सांगितलं की माझे वडील पुण्यातल्या आश्रमात सहभागी होण्यासाठी घरदार सोडून पुण्यात आले. त्यानंतर मलाही आश्रमात आणण्यात आलं.
या महिलेने काय सांगितलं?
या महिलेने सांगितलं की वयाच्या सहाव्या वर्षी मी ओशो ( Osho ) आश्रमात गेले. तिथे माझं लैंगिक शोषण करण्यात आलं. मी जेव्हा १२ वर्षांची झाले तेव्हा माझ्यावर बलात्कार झाला. १६ व्या वर्षी मला कळलं की माझ्यासह काय काय घडून गेलं आहे. या महिलेच्या आयुष्यावर एक सिनेमा येतो आहे. त्याआधी तिने टाइम्सला जी मुलाखत दिली त्यात ओशो आश्रमाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
हे पण वाचा- ओशोंनी रामायणाचं उदाहरण देत सांगितलेली बिरबलाची ‘ही’ गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?
ओशोंच्या मृत्यूला ३४ वर्षे पूर्ण
ओशो ( Osho ) रजनीश यांचा मृत्यू होऊन ३४ वर्षे उलटली आहेत. मात्र आजही त्यांची चर्चा होते. ओशो यांची पुस्तकं मोठ्या प्रमाणावर विकली जातात तसंच त्यांचे ऑडिओही जगभरात मोठ्या प्रमाणावर विकले जातात. भारतासह विदेशात त्यांचे शेकडो अनुयायी आहेत. ११ डिसेंबर १९३१ या दिवशी ओशो यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव चंद्रमोहन जैन असं होतं. याच ओशोंच्या आश्रमात सेक्स स्लेव्ह म्हणून मी काम केलं आहे. असं या महिलेने मुलाखतीत सांगितलं. ही महिला आत्ता ५४ वर्षांची आहे. तिने वयाच्या सहाव्या वर्षापासून काय घडलं ते सांगितलं आहे.
लहान मुलांना कामुकता शिकवली गेली पाहिजे हे ओशो आणि..
या महिलेने सांगितलं रजनीश आणि त्यांचे अनुयायी यांना वाटत होतं की लहान मुलांना कामुकता शिकवली गेली पाहिजे. तसंच तरुण मुलींना वयस्कर पुरुषांनी यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. मी १२ वर्षांची होते तेव्हा मला अमेरिकेत पाठवण्यात आलं. तिथे मी माझ्या आईसह एका आश्रमात राहात होते. त्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी मला स्वतःबाबत घडलेल्या अनेक गोष्टी समजल्या. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
लहान मुलांचं लैंगिक शोषण ओशो आश्रमात सर्रास व्हायचं
या महिलेने तिच्या मुलाखतीत असंही सांगितलं आहे की ओशोंच्या आश्रमात लहान मुलांचं लैंगिक शोषण सर्रास केलं जात असे. मी सात वर्षांची होते तेव्हापासून माझं लैंगिक शोषण झालं. मी १२ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर बलात्कार झाला त्यानंतर पुढच्या तीन वर्षांत माझ्यावर ५० वेळा बलात्कार झाला. ७ ते ११ या वर्षांपर्यंत मला माझ्या मैत्रिणींसह, तसंच माझ्यापेक्षा मोठ्या पुरुषांसह लैंगिक क्रिया करण्यासाठी भाग पाडलं गेलं. असा अनुभव या महिलेने सांगितला आहे.