गुजरातमधील २००२च्या दंगलींच्या मुद्यावर गेली अकरा वर्षे जाहीर वक्तव्य टाळणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या ब्लॉगवरून विस्तृत मतप्रदर्शन केले. ‘गुजरातच्या दंगलींनी माझे काळीज पिळवटून टाकले. त्या अमानवी घटनांनंतर मी आतून पूर्णपणे रिता झालो होतो. पण आज खूप हायसे आणि शांत वाटत आहे,’ असे मोदी म्हणाले. मात्र, गुजरात दंगलींमध्ये गेलेल्या बळींच्याप्रती त्यांनी राज्याचा प्रमुख या नात्यानेही कोणतीही माफी वा खेद व्यक्त केला नाही.
गुजरात दंगलीप्रकरणी येथील न्यायालयाने निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रथमच मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणावर मनोगत व्यक्त केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर मला मी ‘मुक्त आणि शांत’ झाल्याचे वाटत आहे, असे ते म्हणाले.
सुमारे एक हजार शब्दांच्या या ब्लॉगमध्ये मोदींनी गुजरात दंगलींबाबत ‘दु:ख, नैराश्य, वेदना, संताप..’ हे शब्दही कमी पडतील, असे म्हटले. त्याचवेळी आपल्या सरकारने दंगलींदरम्यान तत्पर कारवाई केली, असेही त्यांनी सांगितले.
‘दंगलीला आम्ही योग्यरीतीने हाताळले. कोणाही निष्पापांचे बळी जाऊ नयेत हीच प्रामाणिक भावना त्यामागे होती. दंगली रोखून राज्यात शांतता नांदावी यासाठी आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने ही दंगल हाताळली आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो,’ असे मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
दंगलींच्या मुद्यावर विरोधकांनी आपल्याला अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही, असे सांगत मोदी म्हणतात : ‘गेल्या दशकभरात खूप सोसलेय.. सत्ताधारी असूनही मनातले दु:ख कुणाशी वाटून घेऊ शकत नव्हतो.. असे दिवस कोणतीही व्यक्ती, समाज, राज्य किंवा देश यांच्याबाबतीत कधीच पुन्हा परतून येऊ नयेत, हीच देवाकडे प्रार्थना..’
मोदी उवाच..
*न्यायालयाने दिलेला निर्णय मी माझा वैयक्तिक विजय अथवा पराजय मानत नाही. तसेच मी सर्वानाच, विशेषत: माझ्या विरोधकांनाही, असे आवाहन करतो की, पुन्हा असे आरोप कोणावर करू नका.
*समाजाचे, देशाचे भवितव्य शांतता आणि सद्भावनेच्या पायावरच टिकून राहणार आहे याची मला खात्री झाली आहे. याच्या आधारावरच आपण प्रगती आणि समृद्धी प्राप्त करू शकणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा