शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल (रविवार) घडलेल्या हिंसाचारानंतर देशपातळीवरील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी देखील झाले आहेत. शिवाय, बरीच वाहने पेटवण्यात आल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. तसेच, या घटनेवरून विरोधकांनी आता मोदी सरकार व योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका करणे सुरू केले आहे. काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे.

लखीमपूर खेरी: मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरी; योगी सरकारची घोषणा

“केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने हत्या केलेल्यांच्या प्रति एकजुट दर्शवण्यासाठी मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे जाणार आहे. हा घोर अपराध आहे. आता वेळ आली आहे की, मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि त्यांनी या मंत्र्यास देखील हटवलं पाहिजे. ” असं एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

तर, या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडले? –

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हिंसाचार घडला.