“जर जाचक कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन,” असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते.

राकेश टिकैत यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलनस्थळावरुन शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “मी आत्मसमर्पण करणार नाही. भाजपा याद्वारे काही वेगळंच दाखवू पाहत आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचारासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड समोर आले पाहिजेत. दीप सिंधूबाबत लोकांना माहिती व्हायला हवी. याप्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी”

“सरकारने आमची लाईट-पाण्याची सुविधा तोडली आहे. जर गरज पडली तर गावांमधून आणखी लोक येतील. आम्ही गावांतून पाण्याचे टँकर मागवू. जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत,” असंही टिकैत यावेळी म्हणाले.

Video : घुसखोर असल्याचं म्हणत शेतकरी नेत्यांने लगावली कानशिलात

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने गाजीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळ खाली करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी गाजियाबाद जिल्हा प्रशासनाने दिल्ली-युपीच्या गाजीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आजच आंदोलनस्थळ खाली करण्यास सांगितले होते. सध्या गाजीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.