भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याप्रकरणी शुक्रवारी ( २८ एप्रिल ) ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता पहिल्यांदाच ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे. त्यामुळे आरोपी बनून राजीनामा देणार नाही, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं.
“माझी कोणाविरोधात तक्रार नाही. सर्व प्रकारच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. माझा तपास यंत्रणांवर विश्वास असून, मला न्याय मिळेल,” असा विश्वास ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “मला मारण्याची धमकी मिळत आहे, याबद्दल पंतप्रधानांना सांगितलं होतं, पण…”, विनेश फोगाटचं विधान
“मी निर्दोष असून, सर्व आरोपांना सामोरे जाणार आहे. हे आंदोलन कुस्तीगिरांचं नाहीतर षडयंत्र रचणाऱ्यांचं आहे. आंदोलनाला बसलेल्या कुस्तगिरांच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. पहिल्यांदा त्यांनी माझा राजीनामा मागितला. तेव्हा, म्हटलं होतं की, राजीनामा देणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. पण, राजीनामा देणं म्हणजे आरोप मान्य करण्यासारखं आहे. ते माझ्याविरोधात लोकांना भडकवायचं काम आहेत,” अशी टीका ब्रिजभूषण सिंग यांनी केली.
“ते म्हणत आहेत की, मी तुरुंगात असलं पाहिजे. पण, मी लोकसभेच्या सदस्य आहे. लोकांनी मला निवडून दिलं आहे. विनेश फोगाटमुळे मी निवडून गेलो नाही. एक कुटुंब आणि एक आखाडाच माझा विरोध का करत आहेत? माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे,” असेही ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं.
हेही वाचा : VIDEO : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी जंतरमंतरवर; महिला कुस्तीगिरांची भेट घेत केली चर्चा
“जंतमंतरवर पप्पू यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते का येत आहेत? प्रियंका गांधींनीही जंतरमंतरवर भेट दिली. पण, प्रियंका गांधींना माहिती नाही की, दीपेंद्र हुड्डांनी माझ्याविरोधात कट रचला आहे,” असेही ब्रिजभूषण सिंह म्हणाले.