काश्मीरमधील इंचन् इंच जमीन पाकिस्तानची असल्याने पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर ताब्यात घेईल, अशी दर्पोक्ती पक्षाचे युवानेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली आहे. पंजाब प्रांतात मुल्तान येथे शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
बिलावल यांनी ही दर्पोक्ती जेव्हा केली तेव्हा त्यांच्यासमवेत माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि रझा परवेझ अश्रफ हेही हजर होते. पाकिस्तानात २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढण्याचा इरादा बिलावल यांनी व्यक्त केला. भारतासमवेत उत्तम संबंध ठेवण्याची पीपीपीची इच्छा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
तीव्र पडसाद
नवी दिल्ली :  भुत्तो यांची विधाने म्हणजे सत्याचा अपलाप आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आली . भारताची एकात्मता आणि राष्ट्राचे अखंडत्व यांच्याशी कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केली.
४ अतिरेकी ठार
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या तंगधर क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरक्षारक्षकांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. शनिवारी पहाटे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली.

Story img Loader