पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान रणजीत सिंग भुत्याल शहीद झाले. ही घटना सोमवारीच घडली त्यानंतर आजच म्हणजे मंगळवारी शहीद जवान रणजीत सिंग भुत्याल यांच्या पत्नी शिंपूदेवी यांनी एका मुलीला जन्म दिला. नवजात मुलीला आपल्या वडिलांना पाहताही आले नाही. मात्र आपल्या मुलीलाही मी सैन्यातच पाठवणार आहे. तिने देखील देशसेवा करावी अशी माझी इच्छा आहे असा निर्धार शिंपू देवी यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शिंपूदेवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लान्स नायक रणजीत सिंग भुत्याल हे २२ ऑक्टोबरला सुट्टीवर येणार होते. त्यांनी सुट्टी घेतली होती कारण त्यांची पत्नी गरोदर होती आणि त्यांच्या डिलिव्हरीची तारीख हीच होती. मात्र राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानातील काही घुसखोरांनी घुसखोरी केली आणि त्यांच्याशी दोन हात करताना रणजीत सिंग शहीद झाले. त्यांच्या मृतदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीलाही तिच्या वडिलांप्रमाणेच देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात पाठवणार असल्याचे शिंपूदेवी यांनी सांगितले. देशाला अभिमान वाटावा असेच हे उद्गार आहेत.

 

Story img Loader