भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी ट्विटरवरील संदेशांच्या मालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारांना लक्ष्य केले. पंतप्रधानांना अरूणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला देणाऱ्यांबद्दल मला आश्चर्य वाटते. उद्या न्यायालयाने याविरोधात निर्णय दिल्यास हे सल्लागार कोणत्या तोंडाने उत्तर देतील, असे सिन्हा यांनी म्हटले. अरूणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही सरकारकडून इतक्या घाईघाईत निर्णय का घेण्यात आला, असा सवालही सिन्हा यांनी उपस्थित केला. मला आपल्या हिंमती आणि धडाडीच्या पंतप्रधानांवर कमालीचा विश्वास आहे. मात्र, त्यांना अरूणाचल प्रदेशात राष्ट्रपती लागवट करण्याचा सल्ला देणारे ते थोर सल्लागार कोण आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. विशेषत: हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या समितीच्या देखरेखीखाली प्रलंबित असताना त्यांना असा सल्ला कोणी दिला. इतकी घाई आणि चिंता करण्यासारखे काय होते, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले. समजा हा निर्णय सरकारविरोधात गेला तर हे सल्लागार त्याबद्दल पंतप्रधानांना काय स्पष्टीकरण आणि उत्तर देणार, असा सवालही सिन्हा यांनी विचारला.
केंद्र सरकारकडून शुक्रवारी अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट करण्याचा निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. अरूणाचल प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले होते.
बिहार विधानसभा निवडणुकीपासून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपमधील वितुष्ट झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांत स्वपक्षाच्या अनेक निर्णयांबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा