दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘कालपासून (रविवार) मला १०२ डिग्री ताप आहे. तसेच पोट बिघडल्यामुळे जुलाबही होत आहेत. हे वाईट आहे की मी आज कार्यालयात जाऊ शकत नाही’, असे ट्विट केजरीवाल यांनी आज (सोमवार) केले.

 

‘आज कार्यालयात जाणे खूप महत्वाचे होते, कारण आम्ही आज पाण्याबाबत घोषणा करायचे ठरवले होते. मी आज कार्यालयात जाऊ शकणार नाही ही फार वाईट गोष्ट आहे. देवा खूप चुकीच्या वेळी आजारी पाडलेस’, असंही ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

 

महत्वाच्या घोषणांसाठी सचिवालयात जायला केजरीवाल उत्सुक असले तरी मी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती केजरीवाल यांचे डॉक्टर विपिन मित्तल यांनी दिली आहे.    
दरम्यान, आज संध्याकाळी दिल्ली जल बोर्डाच्या अधिका-यांची एक बैठक बोलवण्यात आली असून नवीन सरकारतर्फे पाण्याबाबत महत्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर अधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ‘आप’ने आपल्या जाहीरनाम्यात ७०० लीटर पाणी मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने या घोषणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.