तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर ते तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. अपघातामध्ये आधी ११ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता हेलिकॉप्टरमधील एकूण १४ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. त्यामुळे अपघातातील एका व्यक्तीवर अजूनही उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे सीडीएस बिपिन रावत यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे देशभरात त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, या अपघातासंदर्भात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ प्रवासी होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने बचावकार्य हाती घेतलं होतं.
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं?
दरम्यान, बचावकार्य संपल्यानंतर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये सीडीएस बिपिन रावत यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरमधील एकूण १४ प्रवाशांपैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याचं अपडेट आधी देण्यात आलं होतं. मात्र, आता १४ पैकी १३ प्रवाशांचं निधन झाल्याचं वृत्त एएआयनं दिलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल हे प्रवास करत होते.
CCS ची महत्त्वपूर्ण बैठक
दरम्यान, सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांची कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी अर्थात CCS ची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.