Indian Air Force Mirage 2000 Crash : भारतीय हवाई दलाशी संबंधित अपघाताची एक बातमी समोर येत आहे. आज (गुरुवारी) मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भारतीय हवाई दलाचे मिराज २००० लढाऊ विमान कोसळले. या अपघातात लढाऊ विमानाचे दोन्ही वैमानिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर लढाऊ विमानाने पेट घेतला असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकसह अनेक ऑपरेशन्समध्ये मिराज-२००० लढाऊ विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २.२० वाजता हवाई दलाचे मिराज २००० लढाऊ विमान मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या करायरा तालुक्यात कोसळले. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाने नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने ते कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दोन्ही वैमानिक सुरक्षित

दरम्यान, अपघातग्रस्त मिराज २००० विमानाचे वैमानिक जखमी झाले आहेत पण ते सुरक्षित आहेत. हे लढाऊ विमान ट्विन सीटर होते. विमान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी एक पथक पाठवले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान कोसळल्यानंतर ते पूर्णपणे जळून खाक झाले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळील एका शेतात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. धूर दिसताच गावातील लोक घटनास्थळाकडे धावू लागले. काही वेळातच गावकऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी जमली. त्यांनी अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकांना बाजूला घेत त्यांना सावरले.

२०१७-२०२२ या कालावधीत लढाऊ विमानांचे ३४ अपघात

संरक्षणविषयक स्थायी समितीच्या नुकतेच जाहीर केलेल्या अहवालात हवाई दलाशी संबंधित विमान अपघातांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, १३ व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत (२०१७-२०२२) हवाई दलाच्या ३४ विमानांचे अपघात झाले आहेत. अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, २०१७-१८ मध्ये, भारतीय हवाई दलाच्या आठ विमानांचे अपघात झाले आहेत. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ११ अपघात झाले आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iaf mirage 2000 crash shivpuri madhya pradesh aam