भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी…हवाई दलातील ‘दुर्गा’…फायटर पायलट हा बहुमान मिळवणाऱ्या या तिघी लवकरच सुखोई -३० या ‘सुपरसॉनिक’ लढाऊ विमानाचे सारथ्य करणार आहेत. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार असून याच महिन्यात त्या ‘सुखोई’ भरारी घेताना दिसतील.
हवाई दलाच्या पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा येथील अॅकॅडमीमध्ये या तिघींचे प्रशिक्षण सुरू आहे. जून २०१६ मध्ये त्या फायटर पायलट म्हणून हवाई दलात रुजू झाल्या होत्या. त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर या महिन्यात त्या सुखोई-३० या लढाऊ विमानातून ‘गगनभरारी’ घेतील. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला ही माहिती दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची लढाऊ वैमानिकांच्या तुकडीत नियुक्ती करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी खूपच चांगले प्रदर्शन केले आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करण्यात आले.
हवाई दलाच्या या अॅकॅडमीमध्ये या तिघींसह ४० जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांचा जून २०१७ मध्येच ‘फायटर पायलट’च्या तुकडीत समावेश करण्यात येणार होता. पण या प्रक्रियेला तब्बल चार महिन्यांचा विलंब झाला. प्रशिक्षण, हवामानसंबंधी समस्या आदींमुळे त्यांच्या समावेशाच्या प्रक्रियेला विलंब झाला, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.