गुजरातमध्ये निवडणूक ड्युटीवर असताना इन्स्टाग्रामवर पोस्ट करणं एका आयएएस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. निवडणूक आयोगाने आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकल्याप्रकरणी निवडणूक ड्यूटीवरून काढून टाकले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. “अभिषेक सिंह यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून आपली नियुक्ती जाहीर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर केला. त्यांनी त्यांच्या अधिकृत पदाचा वापर पब्लिसिटी स्टंट म्हणून केला”, असं आपल्या आदेशात निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी अहमदाबादेतील बापूनगर आणि असरवा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी अभिषेक सिंह यांची नेमणुक निवडणूक निरीक्षक म्हणून करण्यात आली होती. सिंह उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सिंह यांनी इन्स्टाग्रामवर दोन फोटो टाकले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये ते निरीक्षकांच्या सरकारी गाडीच्या बाजुला उभे असल्याचे दिसत आहे. “गुजरात निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून रुजू”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये सिंह यांच्यासोबत तीन अधिकारी आणि सुरक्षा दलाचा जवान आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिंह यांनी लोकसेवक, अभिनेता, सामाजिक उद्योजक आणि आशावादी असं स्वत:च वर्णन केलं आहे. या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने तत्काळ मतदारसंघ सोडायला सांगितलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टबाबत त्यांना उत्तर प्रदेश कॅडरकडे अहवालही सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. फोटोमधील कारसह सिंह यांना गुजरातमध्ये पुरवण्यात आलेल्या सर्व सरकारी सुविधा आयोगाकडून काढून घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी आता आयएएस क्रिश्नन बाजपेयी हे बापूनगर आणि असरवा मतदारसंघांमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला समोर येणार आहे.