भारतीय सनदी सेवा परीक्षांच्या निकालातील गोंधळाचे कारण पुढे करीत मंजुनाथ या युवकाने रविवारी आत्महत्या केली होती, मात्र सदर उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षाही उत्तीर्ण झालेला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
बंगळुरू येथील २४ वर्षीय मंजुनाथ या तरुणाने १० मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम निकालपत्रकामध्ये आपल्या परीक्षा क्रमांकासमोर भलत्याच उमेदवाराचे नाव असल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचा दावा मंजुनाथने केला होता, अशी माहिती येथील पोलिसांनी दिली. मंजुनाथच्या मते त्याचा अंतिम गुणवत्ता यादीत २६४ वा क्रमांक होता.
या पाश्र्वभूमीवर, केंद्रीय लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण देताना प्रसारमाध्यमांमधून देण्यात आलेले हे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला. आयोगाच्या नोंदींनुसार, व्ही. वाय.मंजुनाथ या तरुणाचा परीक्षा क्रमांक ५३८९५० असा होता. सदर उमेदवारास बंगळुरू हे केंद्र परीक्षेसाठी देण्यात आले होते, मात्र या क्रमांकाच्या आणि या नावाच्या उमेदवाराने सन २०१२ मध्ये घेतली गेलेली पूर्वपरीक्षाच उत्तीर्ण केली नव्हती, तसेच या क्रमांकाचा उमेदवार मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीसाठी स्वाभाविकपणे पात्र ठरला नव्हता आणि म्हणूनच मंजुनाथबाबत केलेला दावा सर्वस्वी खोटा असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान ७ मे २०१३ रोजी मंजुनाथ याच्या प्रदीपकुमार नावाच्या मित्राने निकालातील गोंधळाबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करणारा फॅक्स पाठवला होता.