‘आयएएस’च्या पूर्वपरीक्षेमधील नागरी सेवा कल चाचणी अर्थात ‘सीसॅट’ची प्रश्नपत्रिका रद्द केली जावी यासाठी शेकडो आयएएस इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी दिल्लीत धरणे आंदोलन केले. आंदोलकांची संभाव्य हालचाल लक्षात घेत पोलिसांनी चार मेट्रो रेल्वे स्थानके ११:१५ वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मागील आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी केंद्रीय नागरी सेवा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. सर्व उमेदवारांना परीक्षा देण्यासाठीची कमाल वयोमर्यादा दोनऐवजी चार वर्षांनी वाढवून मिळावी, अशी या उमेदवारांची मागणी होती.
त्याच पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी सकाळी शकडो उमेदवार दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागामध्ये गोळा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मोर्चामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आधी राजघाटकडे आणि नंतर रेसकोर्स मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, रेस कोर्स आणि उद्योग भवन ही चार मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्याच्या सूचना दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळास दिल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘आयएएस’च्या परीक्षेतील पहिल्या टप्प्यात होणारा सीसॅटचा पेपर रद्द करण्यात यावा, अशी आंदोलकांची मागणी होती. या प्रश्नपत्रिकेतील गणिते आणि इंग्रजी भाषेचे प्रश्न यामुळे काही उमेदवारांना अनुचित फायदे होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Story img Loader