‘आयएएस’च्या पूर्वपरीक्षेमधील नागरी सेवा कल चाचणी अर्थात ‘सीसॅट’ची प्रश्नपत्रिका रद्द केली जावी यासाठी शेकडो आयएएस इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी दिल्लीत धरणे आंदोलन केले. आंदोलकांची संभाव्य हालचाल लक्षात घेत पोलिसांनी चार मेट्रो रेल्वे स्थानके ११:१५ वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मागील आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी केंद्रीय नागरी सेवा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. सर्व उमेदवारांना परीक्षा देण्यासाठीची कमाल वयोमर्यादा दोनऐवजी चार वर्षांनी वाढवून मिळावी, अशी या उमेदवारांची मागणी होती.
त्याच पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी सकाळी शकडो उमेदवार दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागामध्ये गोळा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मोर्चामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आधी राजघाटकडे आणि नंतर रेसकोर्स मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, रेस कोर्स आणि उद्योग भवन ही चार मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्याच्या सूचना दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळास दिल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘आयएएस’च्या परीक्षेतील पहिल्या टप्प्यात होणारा सीसॅटचा पेपर रद्द करण्यात यावा, अशी आंदोलकांची मागणी होती. या प्रश्नपत्रिकेतील गणिते आणि इंग्रजी भाषेचे प्रश्न यामुळे काही उमेदवारांना अनुचित फायदे होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
‘आयएएस’ इच्छुकांचे दिल्लीत धरणे आंदोलन
‘आयएएस’च्या पूर्वपरीक्षेमधील नागरी सेवा कल चाचणी अर्थात ‘सीसॅट’ची प्रश्नपत्रिका रद्द केली जावी यासाठी शेकडो आयएएस इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी दिल्लीत धरणे आंदोलन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-06-2014 at 02:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias aspirants bring protest in delhi