भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी पाकिस्तानना लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी आपला प्रशासकीय सेवा अधिकारी पदापर्यंतचा प्रवासही उलगडला. भारत वगळता इतर कोणत्याही ठिकाणी मुस्लिमांना इतकं स्वातंत्र्य मिळणार नाही अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
शाह फैजल यांनी अनेक ट्वीट केले असून म्हटलं आहे की “काश्मीरमधील एक तरुण नागरी सेवा परीक्षेत अव्वल ठरतो, सरकारमध्ये उच्च पदावर जातो, त्यानंतर सरकारपासून विभक्त होतो आणि पुन्हा तेच सरकार त्याला सोडवून पुन्हा सेवेत घेतं हे फक्त भारतात होऊ शकतं”.
शाह फैजल हे २००९ मधील आयएएस टॉपर आहेत. त्यांनी जानेवारी २०१९ मध्ये राजीनामा देत सक्रीय राजकारणात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं होतं. केंद्र सरकारकडून ‘काश्मीरमधील नागरिकांच्या होणाऱ्या हत्या, मुस्लिमांच्या हक्कांकडे दुर्लक्ष आणि सार्वजनिक संस्था नष्ट’ करण्याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
“..फिर भी दिल है हिंदुस्तानी”… ऋषी सुनक यांचा मनगटावर पवित्र गंडा बांधून गृहप्रवेश!
राजीनामा दिल्यानंतर फैजल यांनी जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) पक्षाची स्थापना केली होती. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर फैजल यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याआधी त्याआधी, देशात बलात्काराच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करताना त्यांना देशाला ‘रेपिस्तान’ संबोधलं होतं. यावरुन त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
“ऋषी सुनक यांची नेमणूक आपल्या शेजाऱ्यांसाठी आश्चर्याचा धक्का असू शकतो. जिथे घटनेनुसार फक्त मुस्लीम व्यक्तीच सरकारमधील सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते. पण भारतीय लोकशाही जातीय आणि धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये कधीही भेदभाव करत नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
“भारतात मुस्लिमांना समान नागरिकांचा दर्जा मिळत असून, इतर कोणत्याही इस्लामिक देशांमध्ये विचार करु शकत नाही इतकं स्वातंत्र्य आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
शाह फैजल यांनी आपला प्रवास उलगडला असून आपल्याला प्रत्येक पावलावर देशात आदर आणि पाठिंबा मिळाल्याचं म्हटलं आहे. “मौलाना आझाद यांच्यापासून ते डॉक्टर मनमोहन सिंग, झाकीर हुसेन, द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत प्रत्येकाला या देशात समान संधी आहे. मी सर्वोच्च पदावर पोहोचून मी स्वत: हे पाहिलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.