IAS Pooja Khedkar Controversy : महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली, असा आरोप केला गेला. पूजा खेडकर यांचे प्रकरण समोर आल्यानंतर इतर अनेक प्रकरणे समोर आली. दिव्यांग उमेदवारांना आयएएस पदासारखे महत्त्वाचे आणि जबाबदारी असलेले पद द्यावे का? अशी चर्चा आता ज्येष्ठ सनदी अधिकारी स्मिती सभरवाल यांनी सुरू केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी या वादाला तोंड फोडले. त्यानंतर दिव्यांग नागरिकांकडून आक्षेप नोंदविला गेला. तसेच अनेकांनी सभरवाल यांच्यावर टीकादेखील केली. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी स्मिता सभरवाल या तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य आणि सचिव आहेत. त्यांनी नागरी सेवेमध्ये अपंगांना राखीव जागा ठेवण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरी सेवेशी संबंधित पोस्टमध्ये अपंगांना सामावून घेतले जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्मिता सभरवाल काय म्हणाल्या?
स्मिता सभरवाल यांनी एक्स या साईटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “आता या विषयावर चर्चा सुरू झालीच आहे. त्यामुळे मी सर्व दिव्यांग नागरिकांची माफी मागून एक विषय मांडू इच्छिते. एखादी एअरलाईन कंपनी अपंगाला वैमानिक म्हणून कामावर घेऊ शकते का? तसेच अपंगत्व असलेल्या शल्यचिकित्सकावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? एआयएस या कामाची (आयएएस / आयपीएस / आयएफओएस) पद्धत अशी आहे की, अनेकदा त्यांना फिल्डवर जायला लागते, अनेक तास काम करावे लागते, लोकांच्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागतात, त्यानुसार निर्णय करावे लागतात. या कामासाठी शारीरिकदृष्ट्या व्यक्ती सक्षम हवा. अशा महत्त्वाच्या सेवेसाठी राखीव जागांचा अट्टाहास का केला जात असावा?”
स्मिता सभरवाल यांच्या पोस्टनंतर हैदराबादमध्ये एका दिव्यांग कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विकलांग हक्क रक्षा समिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जांगय्या यांनी हैदराबाद येथे तक्रार दाखल केली. स्मिता सभरवाल यांच्या पोस्टमुळे संपूर्ण दिव्यांग समाजाचा अपमान झाला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा >> IAS पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ‘वायसीएम’च्या ‘त्या’ डॉक्टरांना क्लीन चिट! चौकशीत निर्दोष
शिवसेना उबाठा गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सभरवाल यांच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “हा अतिशय चुकीचा दृष्टीकोन आहे. सनदी अधिकारी त्यांच्या विचारांच्या मर्यादा आणि त्यांचे विशेष महत्त्व दाखवून देत आहेत, हे यातून दिसते”
स्मिता सभरवाल यांच्या पोस्टवर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांनीही आक्षेप नोंदविला. ते म्हणाले, एक सनदी अधिकारी दिव्यांगाचे अधिकार झिडकारून लावत आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. अपंगत्वाचे अनेक प्रकार हे शारीरिक उत्साह आणि ऊर्जेवर किंवा ज्ञानावर काहीही परिणाम करत नाहीत. पण सभरवाल यांच्या पोस्टमुळे त्यांच्यामध्ये जागृती आणण्याची गरज आहे, असे वाटते.
आपल्या विधानावर जोरदार संताप व्यक्त झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्मिता सभरवाल यांनी आपल्या पोस्टवर स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, माझ्या पोस्टखाली अनेकांनी संताप व्यक्त केला. दिव्यांग अधिकार कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की,त्यांनी आयपीएस आणि आयएफओएस आणि सुरक्षा क्षेत्राशी निगडित पोस्टमध्ये दिव्यांग कोटा का उपलब्ध नाही, याची चौकशी करावी. माझे म्हणणे ऐवढेच आहे की, आयएएसचे कामही यापेक्षा वेगळे नसते.
हे ही वाचा >> पूजा खेडकरांप्रमाणेच आणखी एक माजी IAS अधिकारी अपंगत्वाच्या दाखल्यावरून चर्चेत! डान्स आणि जिमच्या व्हिडीओमुळे गोत्यात?
दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची चर्चा
अभिषेक सिंग (Abhishek Singh) हे २०११ च्या बॅचचे IAS अधिकारी होते. मध्यंतरी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. UPSC निवड प्रक्रियेत सवलत मिळविण्यासाठी त्यांनी लोकोमोटर अपंग असल्याचा दावा केला होता. परंतु, त्यांच्या डान्स आणि जिमच्या व्हिडिओमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत आले होते. तसेच कार्तिक कंसल हेदेखील अपंगत्वामुळे चर्चेत होते. चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना आयएएस हे पद दिले गेले नाही.