राजस्थानातल्या जैसलमेर जिल्ह्यात असलेल्या अमर सागर भागात राहणाऱ्या निर्वासित कुटुंबांची घरं बुलडोझरने उडवण्यात आली आहेत. हे सगळे लोक पाकिस्तानातून निर्वासित होऊन दीर्घ काळ या ठिकाणी राहात होते. मात्र जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशानंतर UIT च्या सहाय्यक अभियंत्यांच्या नेतृत्वात बुलडोझर चालवण्याची कारवाई केली गेली. या भागात असलेली सगळी घरं बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात महिला, लहान मुलांना रस्त्यावर यावं लागलं आहे.

रस्त्यावर सगळं सामान अस्ताव्यस्त

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दहशतवाद आणि अराजक माजलं आहे. त्यामुळे अनेक कुटुंबं निर्वासित झाली आहेत. हीच कुटुंब जैसलमेर भागात वास्तव्य करत होती. मात्र टीना डाबी यांनी दिलेल्या आदेशानंतर ही कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. या कुटुंबाची घरं बुलडोझर चालवून उडवण्यात आल्यानंतर या सगळ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. सगळं सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त स्वरुपात पडलं आहे. जेव्हा कारवाई करायला लोक आले होते तेव्हा महिलांनी कडाडून विरोध केला. मात्र कुणाचंही न ऐकता ही घरं जमीनदोस्त करण्यात आली. सध्याच्या घडीला कडक उन्हात बसायची वेळ या सगळ्यांवर आली आहे. अनेक महिलांनी आपलं घर डोळ्यांदेखत जमीनदोस्त केलं गेल्याने टाहो फोडला आहे. मात्र त्यांचं ऐकणारं इथे कुणीही नाही.

पाकिस्तानात ज्या कुटुंबाना त्रास देण्यात आला, त्यांना घर सोडण्यास भाग पाडलं गेलं. ते सगळेच निर्वासित राजस्थानच्या सीमेवर येऊन राहात होते. मात्र त्या सगळ्यांची घरं बुलडोझरने जमीनदोस्त केली गेली आहेत. ५० पेक्षा जास्त कच्ची घरं पाडण्यात आली आहेत. बुलडोझर किंवा जेसीबीच्या मदतीने ही घरं पाडण्यात आली आहेत. या कारवाईमुळे १५० पेक्षा जास्त महिला, पुरुष आणि लहान मुलं रस्त्यावर आली आहेत. अमर सागर या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावाजवळ ही घरं बांधण्यात आली होती.

जैसलमेर जिल्हा मुख्यालयापासून चार किमी दूर अंतरावर हे निर्वासित राहात होती. कच्ची घरं बांधून ते राहात होते. हे अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. टीना डाबी यांनी याबाबतचे आदेश दिले होते. या अतिक्रमण कारवाईची चर्चा ट्वीटरवरही होते आहे.