घरी बसून तुम्ही दूरचित्रवाणीवर कोणत्या वाहिन्या बघत आहात, हे तात्काळ जाणून घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय देशातील सर्व सेटटॉप बॉक्समध्ये चीप बसविण्याच्या तयारीत आहे. 
केंद्र सरकारचे हे पाऊल म्हणजे देशातील नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रकार असल्याचे सांगत काही संघटनांनी आतापासूनच त्याला विरोध करण्याची भूमिका घेतलीये. मात्र, सध्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाची लोकप्रियता तपासण्यासाठी वापरात असलेल्या ‘टीआरपी’च्या पद्धतीला पर्याय म्हणूनच केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील सर्व महानगरे आणि ३८ मोठ्या शहरांमध्ये केबलद्वारे सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून सेवा पुरविणारे आणि डीटीएच (डायरेक्ट टू होम) या दोघांनाही ग्राहकांकडील सेट टॉप बॉक्समध्ये ही चीप बसवावी लागणार आहे.
देशातील सर्वच शहरे आणि गावांमध्ये सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातूनच केबलसेवा येत्या काही वर्षांमध्ये बंधनकारक करण्यात येईल. या योजनेच्या तिसऱया आणि चौथ्या टप्प्यांमध्ये ग्राहकांना मिळणाऱया सेट टॉप बॉक्समध्ये आधीपासूनच ही चीप बसवलेली असेल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

Story img Loader