IC 814 Hijack Case 1999: नुकत्याच NetFlix वर प्रदर्शित झालेल्या IC 814: The Kandahar Hijack या वेब सिरीजमधील संदर्भांवरून काही आक्षेप घेण्यात आले. त्यातील एक आक्षेप तर थेट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानंच घेतला होता. दहशतवाद्यांची नावं आणि आयएसआयच्या सहभागाचा अपुरा उल्लेख या आक्षेपांवरून नेटफ्लिक्सच्या भारतातील प्रमुखांनाही मंत्रालयानं पाचारण केलं होतं. या घटनेतील अपहृत व्यक्ती आता त्यांची आपबिती सांगत आहेत. अशाच एका महिला प्रवाशाने २५ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या प्रसंगाबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंदीगढला राहणाऱ्या ४७ वर्षीय उद्योजिका पूजा कटारिया या त्या विमानावर अपहरण झालेल्या १७९ प्रवाशांपैकी एक. त्यांचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं. त्या पतीसह नेपाळला फिरायला गेल्या होत्या. तिथून परत येत असतानाच २४ डिसेंबर १९९९ रोजी विमानाचं अपहरण झालं. हरकत-उल-मुजाहिदीन संघटनेच्या दहशवाद्यांनी हे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदाहारला नेलं. या प्रसंगाची भीती अजूनही त्यांच्या डोळ्यांत सहज जाणवते.

पूजा कटारिया यांनी सांगितली आपबीती

“मी आजही ते क्षण विसरू शकत नाही. सुरुवातीला आम्हाला कळलंच नाही की नेमकं काय घडतंय. लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. २७ डिसंबरला माझा वाढदिवस असतो. २६ डिसेंबरला अपहरणकर्त्या दहशतवाद्यांपैकी एकाला लक्षात आलं की लोकांमध्ये घबराट पसरू लागली आहे. त्यानं विमानातल्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याला एक विनंती केली”, अशी माहिती पूजा कटारिया यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

आय सी ८१४: कंदहार हायजॅक (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

“मी त्याला सांगितलं की उद्या माझा वाढदिवस आहे. कृपा करून आम्हाला घरी जाऊ द्या. आम्ही निर्दोष आहोत. त्यानंतर त्यानं पांघरलेली शाल त्यानं मला दिली. तो म्हणाला, हे घे, तुझं वाढदिवसाचं गिफ्ट”, असं कटारिया म्हणाल्या.

…आणि तडजोड झाली, प्रवाशांची सुटका झाली!

अपहरणकर्ते विमानात एकमेकांना दुसऱ्या नावांनी हाका मारत होते. त्यात चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर ही नावं होती. तर त्यांची खरी नावं इब्राहिम अथर, शाहिद अख्तर सय्यद, सनी, अहमद काझी, झहूर मिस्त्री आणि शाकीर अशी होती. जवळपास एक आठवडा चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारनं दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यात तेव्हा तुरुंगात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांच्या सुटकेची प्रमुख मागणी होती. यादरम्यान १७९ प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

Netflix’s IC 814: The Kandahar Hijack : भारताला हादरवून टाकणाऱ्या विमान अपहरणाची कहाणी

“जेव्हा ते निघून जात होते, तेव्हा बर्गर माझ्याकडे आला. तो म्हणाला, मी त्या शालवर माझा संदेश लिहून देतो. मी खूप घाबरले होते. त्यानं लिहिलं, माझी प्रिय बहीण आणि तिच्या हँडसम पतीसाठी…बर्गर. ३०/१२/१९९९”, अशी आठवण कटारिया यांनी यावेळी सांगितली. “लोक यासाठी माझी मस्करी करतात. पण तरीही मी अजून ती शाल जपून ठेवली आहे. एकप्रकारे आमचा पुनर्जन्मच झाला होता. त्याची आठवण म्हणून मी ती शाल जपून ठेवली आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

पुढची १० वर्षं पूजा कटारिया विमानात बसल्याच नाहीत. अजूनही त्या जेव्हा विमान प्रवास करतात, तेव्हा त्यांना त्या दिवसांची आठवण होते. “जेव्हा तुम्हाला हे माहिती नसतं की तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांकडे परत येणार आहात की नाही, तेव्हा ती फारच भयानक गोष्ट असते. आम्ही जेव्हा घरी सुरक्षित पोहोचलो, त्यानंतर अनेक वर्षं ते भयानक ७ दिवस माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. मी अजूनही त्या दिवसांबाबत माझ्या मुलांना सांगत असते. ते विमान प्रवासाला जातात, तेव्हाही मी त्यांना काळजी घ्यायला सांगत असते”, असं पूजा कटारिया आवर्जून सांगतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ic 814 the kandahar hijack real story women kept shawl given by one of terrorist burger pmw