वर्षाचे महिने, महिन्यातील आठवडे, आठवड्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिटे आणि मिनिटांचे सेकंद उलटले; तरी गेल्या ७४ वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटलढतींचे औत्सुक्य मात्र टिकून आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे गेल्या काही वर्षांत उभय संघांमधील सामन्यांची संख्या रोडवली आहे; परंतु ‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज दुबईत हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
ट्वेन्टी-२० या क्रिकेट प्रकारात विजयाचे अंतर बऱ्याचदा निसटते असते. त्यामुळेच कोणताही संघ अनपेक्षितपणे बाजी पलटवू शकतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आणि या प्रकारातील विश्वचषकाच्या आकडेवारीत भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड आहे, हेच २००७च्या पहिल्या विश्वचषकापासून सिद्ध झाले आहे. भारताने सर्व सामने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाबर आझमच्या पाकिस्तान संघाशी सामना करणार आहे. त्यामुळे प्रक्षेपणकर्ते, चाहते, जाहिरातदार आदी घटकांनी या सामन्याची चर्चा रंगात आणली आहे.
जाणून घ्या कसा पाहता येईल हा सामना?
आयसीसी ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज दुबईमध्ये खेळण्यात येत आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स १ आणि १ HD या वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तर हॉटस्टार या अॅपवरही हा सामना क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे.
या सामन्याविषयीचे ताजे अपडेट्स loksatta.com ही आपणाला वारंवार देत राहीलच. तेव्हा या सामन्याविषयी जाणून घेण्यासाठी loksatta.com ही फॉलो करत राहा.