चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोग करून वेगळी वाट निर्माण करणारे दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या निधनाने सत्यजित राय, ऋत्विक घटक यांच्याच ओळीतील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. माझे प्रयोग कधी संपणार असे ते नेहमी म्हणायचे, पण त्यांचे हे प्रयोग कधीच संपले नाहीत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नील अकशेर नीचे, भुवन शोम, एक दिन अचानक, पदातिक व मृगया या चित्रपटांमधून त्यांनी एक नवा प्रवाह आणला. चित्रपट हा निव्वळ करमणुकीसाठी नसतो तर त्यातून लोकशिक्षण व उन्नयन झाले पाहिजे या मताचे ते होते. खरेतर ते अपघातानेच या क्षेत्रात आले. चित्रपट सौंदर्यशास्त्रावरील एक पुस्तक वाचत असताना ते चित्रपटाकडे वळले. त्यांनी एकूण साठ वर्षांत अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. काहींच्या पटकथा लिहिल्या, काही चित्रपटांची निर्मिती केली.

पद्मभूषणने सन्मानित असलेल्या सेन यांचा पहिला चित्रपट रात भोरे (१९५५), नंतर नील आकाशेर नीचे (१९५९) पण त्यातून फार मोठे मंथन झाले असे नाही, तर १९६० मध्ये ‘बाइशे श्रावण’ हा चित्रपट आला तेव्हा एक सामाजिक भान असलेला दिग्दर्शक व निर्माता म्हणून त्यांचे नाव पुढे आले. लोककेंद्री कथनशैलीने त्यांनी चित्रपटांना नवे परिमाण दिले. एक दिन अचानक (१९८९), महापृथ्वी (१९९१) तसे प्रस्थापित विरोधी नसले तरी त्यांनी सामाजिक मूल्ये व व्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ओका ओरी कथा (१९७७) हा तेलुगू चित्रपट त्यांनी केला होता. त्यातून ग्रामीण जीवनाचे अनेक बारकावे सामोरे आले. त्यांनीच मिथुन चक्रवर्ती यांना ‘मृगया’मधून चित्रपटात आणले. इंटरव्हय़ू, कलकत्ता ७१, पदातिक, हे त्यांचे तीन चित्रपट कोलकात्यातील सत्तरीच्या दशकात घडत गेलेल्या सामाजिक व राजकीय बदलांचे प्रतीक ठरले. मी चित्रपट करतो तेव्हा कोसळून गेल्यासारखे वाटते, पण पुन्हा उठून कामाला लागतो, असे त्यांनी त्यांच्या ‘आमार भुवन’ या शेवटच्या चित्रपटावेळी २००२ मध्ये म्हटले होते. सहिष्णुता व विविधता या पैलूंवर त्यांनी भर दिला होता. कोलकाता एकाटोर, जेनेसिस, खारीज, एक दिन प्रोतिदिन, अकालेर संधाने, खंडहर, अंतरीन हे त्यांचे चित्रपट गाजले. ‘खारीज’ चित्रपटात ममताशंकर व अंजन दत्ता यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला १९८३ मध्ये कान, व्हेनिस, बर्लिन, कालरेव्ही व्हेरी महोत्सवात गौरवण्यात आले. फ्रान्स सरकारचा ‘ऑर्डर ऑफ आर्टसि अँड लेटर्स’ पुरस्कार त्यांना मिळाला होता. फरिदपूर येथे १४ मे १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला. आता हे ठिकाण  बांगलादेशात आहे. सेन हे डाव्या विचारसरणीचे समर्थक होते. त्यांनी उडिया भाषेत चित्रपट केले. अनेक लघुपट त्यांच्या नावावर आहेत. ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे सदस्य व एफटीआयआयचे अध्यक्षही होते. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. मार्क्‍सवादी विचारांचा प्रभाव असूनही ते माकपचे सदस्य झाले नाहीत. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये ते कार्यरत होते. १९९८ ते २००३ दरम्यान राज्यसभेचे सदस्यत्व त्यांना मिळाले.

Story img Loader