अमेरिकेने निर्बंध कायम ठेवले तर अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरिया वेगळा मार्ग अवलंबेल, असा धोक्याचा इशारा उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी नववर्षदिनानिमित्त केलेल्या भाषणात दिला आहे.

गेले बारा महिने दोन्ही देशांत राजनैतिक समझोत्याचे चित्र होते. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प व किम जोंग उन यांच्यात सिंगापूर येथे जूनमध्ये शिखर बैठक झाली होती व दोघांनी कोरियन द्वीपकल्पाच्या अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाबाबत अत्यंत ढिसाळ भाषेत लिहिलेल्या वचनपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. किम जोंग यांनी मंगळवारी सांगितले, की ‘जर अमेरिकेने दिलेली आश्वासने पाळली नाहीत व र्निबध काढले नाहीत तर त्याचे वाईट परिणाम होतील. आम्हाला आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी वेगळय़ा मार्गाचा अवलंब करावा लागेल. आम्हाला आमच्या देशाचे हित महत्त्वाचे आहे. अमेरिकेने आमची अण्वस्त्रे नष्ट करण्याबाबत गुंडांसारखी भूमिका घेत र्निबध लादून वाईट वागणूक दिली. पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने स्वागतार्ह परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण पुन्हा ट्रम्प यांना भेटण्यास तयार आहोत.’

दरम्यान, अमेरिकेने उत्तर कोरिया जोपर्यंत अण्वस्त्रे पूर्ण नष्ट करीत नाही तोपर्यंत र्निबध लागू ठेवण्याचे धोरण ठेवले आहे. किम यांनी त्यांच्या भाषणात आतापर्यंतच्या वाटाघाटीत प्रगती झाली नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. उत्तर कोरियाने अण्वस्त्रनिर्मितीचे ठिकाण नष्ट केले. त्यानंतर अमेरिकाही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल अशी उत्तर कोरियाची अपेक्षा होती पण ती फोल ठरली.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला किम यांनी मोठय़ा प्रमाणात अण्वस्त्रे निर्माण करण्याचा आदेश त्यांच्या भाषणातून दिला होता. पण या वेळी त्यांनी आम्ही अण्वस्त्रनिर्मितीवर चाचण्या करणार नाही, पण अमेरिकेने त्याला अनुकूल असाच प्रतिसाद दिला पाहिजे असे नववर्षांच्या भाषणात सांगितले.

Story img Loader