नवी दिल्ली : मोठय़ा प्रमाणावर नुकसान करण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेली तीन किलो स्फोटके दिल्लीतील फुलबाजाराजवळ शुक्रवारी सापडली. ही स्फोटके नष्ट करण्यात आली असली, तरी लवकरच येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सतर्कता बाळगण्यात आली आहे
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या संशयास्पद पेटीबाबत पोलिसांना सकाळी १० वाजून १९ मिनिटांनी कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर एनएसजीच्या बॉम्बनाशक पथकाला पाचारण केले. या पेटीत आयईडी ठेवल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली पोलिसांचे विशेष कक्षाचे अधिकारीही तेथे दाखल झाले होते. एनएसजीच्या पथकाने नजीकच्या परिसरात ही स्फोटके नष्ट केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घडले काय ? पूर्व दिल्लीत शुक्रवारी सकाळी गाझीपूर बाजार परिसरात रहिवाशांना एका बेवारस पिशवीत संशयास्पद लोखंडी पेटी आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या पेटीत आयईडी सापडले. राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी ) त्याचा नियंत्रित स्फोट घडवून ते नष्ट केले.